सार्वजनिक बांधकाम खात्याकडून गती : 72 लाख निधीची तरतूद
बेळगाव : तिसऱ्या रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्याच्या कामाला अखेर शुक्रवारपासून प्रारंभ झाला. उड्डाणपुलावरील सध्या खराब झालेला रस्ता काढून त्या ठिकाणी डांबरीकरण केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने या कामासाठी ऑक्टोबरअखेरीस निविदा काढण्यात आली होती. त्याद्वारे एकूण 72 लाख रुपये खर्चून उड्डाणपुलावरील रस्त्यासोबत खानापूर रोडवरील खड्डे बुजविले जाणार आहेत. उद्यमबाग, पिरनवाडी, मच्छे, तसेच खानापूर रोडला व बेळगाव शहराला जोडणाऱ्या तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्याची दूरवस्था झाली होती.
ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालविणेही अवघड होत होते. माती व खडी उखडून बाहेर आल्याने त्यातूनच वाहने चालवावी लागत होती. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी यापूर्वी अनेकवेळा आंदोलने केली. पंधरा दिवसांपूर्वी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक दिवसीय आंदोलनही केले. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी लवकरच रस्त्यासाठी निविदा काढल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. डांबरीकरणासाठी एकूण 72 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उड्डाणपुलावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यासोबतच खानापूर रोडवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्येही डांबर घातला जाणार आहे.
दहा दिवस रस्ता बंद ठेवला जाणार
सततच्या पावसामुळे रस्त्याचे काम रखडले होते.अखेर मागील दोन दिवसांत पावसाने काहीशी उघडीप दिल्याने शुक्रवारपासून कामाला सुरुवात करण्यात आली. सकाळपासून रस्ता बंद करून उखडलेली खडी, तसेच डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता काढण्यात आला. पुढील दहा दिवस रस्ता बंद ठेवला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अखेर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने टिळकवाडी, तसेच परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.









