वकिलांतून आनंद, पेढे वाटून सरकारचे अभिनंदन
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्य ग्राहक आयोग पीठ बेळगावला मंजूर करण्यात यावे, यासाठी गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या मागणीला अखेर यश आले आहे. राज्य सरकारने शुक्रवार दि. 6 रोजी नऊ जिल्ह्यांसाठी बेळगावात राज्य ग्राहक आयोग पीठाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे शनिवारी वकिलांनी न्यायालय आवारात एकमेकांना पेढे भरवून सरकारचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला. बेळगावात यापूर्वी केवळ एकच जिल्हा ग्राहक न्यायालय होते. त्यामुळे अपील करायचे असल्यास वकील आणि पक्षकारांना बेंगळूरला जावे लागत होते. यासाठी धावपळ करण्यासह आर्थिक खर्च करावा लागत होता. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात राज्य ग्राहक आयोग पीठ सुरू करण्यात यावे, अशी मागणी गेल्या चार वर्षांपासून बेळगाव बार असोसिएशन आणि कामगार नेते अॅड. एन. आर. लातूर यांच्याकडून केली जात होती. अनेकवेळा मंत्री, आमदार, त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणी करण्यात येत होती.
तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वकिलांनी पाच दिवस उपोषणही केले होते. यासाठी बार असोसिएशनच्यावतीने सातत्याने पाठपुरावा केला जात होता. अखेर राज्य सरकारने बेळगाव जिल्ह्यात राज्य ग्राहक आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश शुक्रवारी जारी करण्यात आला असून ही बातमी समजताच शनिवारी वकिलांनी न्यायालयात पेढ्यांचे वाटप करून आनंद व्यक्त केला. बेळगाव जिल्ह्यातील राज्य ग्राहक आयोगाद्वारे बेळगावसह बागलकोट, विजापूर, धारवाड, हावेरी, मंगळूर, उडुपी, कारवार या नऊ जिल्ह्यांतील खटले हाताळले जाणार आहेत. ऑटोनगर येथील भाड्याच्या इमारतीत राज्य ग्राहक आयोग पीठ सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 9 तारखेपासून कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. यादरम्यानच्या काळात कायदा मंत्र्यांच्या हस्ते राज्य ग्राहक आयोग पीठाच्या इमारतीचे उद्घाटन केले जाणार आहे. मात्र, अद्याप उद्घाटनाची तारीख निश्चित झालेली नाही.









