एकमताने मुज्जमिल डोणी यांची निवड
प्रतिनिधी/ बेळगाव
मनपामध्ये सभागृह अस्तित्त्वाला आल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी विरोधी गटनेता निवडण्यात आला आहे. विरोधी नगरसेवकांनी एकमताने मुज्जमिल डोणी यांची निवड केली. याबाबत महापौरांकडे निवड केल्याचे पत्र विरोधी गटाने दिले. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर शोभा सोमणाचे यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर विरोधी गटाने एकजुटीने त्यांना विरोधी गटनेता म्हणून मान्यता दिली.
विरोधी गटनेतेपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. मुज्जमिल डोणी यांच्यासह नगरसेवक अझीम पटवेगार यांचे नाव चर्चेत होते. याचबरोबर म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनीही प्रयत्न केले होते. त्यानंतर महापालिकेतील विरोधी गटाच्या नगरसेवकांची बैठक आमदार राजू सेठ यांनी घेतली. त्यांनी सर्वांचे मत ऐकून नगरसेवक मुज्जमिल डोणी यांना विरोधी गटनेते म्हणून घोषणा केली. याबाबत महापौर शोभा सोमणाचे यांना माहिती दिली.
विरोधी गटाच्या या प्रस्तावाबाबत सभागृहामध्ये महापौर शोभा सोमणाचे यांनी चर्चा करण्याची सूचना केली. त्यानंतर चर्चा झाली व विरोधी गटनेता म्हणून डोणी यांचे नाव घोषित करण्यात आले. आता महापालिकेच्या सभागृहाला विरोधी गटनेता मिळाला असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे यावेळी नगरसेवक डोणी यांनी सांगितले. या निवडीबद्दल विरोधी गटातील नगरसेवकांबरोबरच सत्ताधारी गटातील नगरसेवकांनीही त्यांचे अभिनंदन केले.









