मध्यरात्रीनंतर अडीच वाजता ग्रामस्थांनी सोडला नि:श्वास

फेंड़ा : कुळण सावईवेरे येथील कुळागरी भागात भक्ष्याच्या शोधात असताना कुत्री पाठीमागे लागल्याने माडावर चढून अडकलेला बिबट्या तब्बल 20 तासानंतर स्वत: माडावरून खाली उतरून जंगलाच्या दिशेने पळाल्याची माहिती काल सोमवारी सकाळी वनखात्याच्या अधिकाऱ्यानी ग्रामस्थांना दिली. कुत्र्यांनी पाठलाग केल्याने जिवाच्या आकांताने पळताना बिबट्या 20 मिटर उंच माडावर चढल्याने अडकून पडल्याचा प्रकार रविवार 14 रोजी सकाळी कुळण सावईवेरे येथे उघडकीस आला होता. कुळण सावईवेरे येथे वाहतूक पोलीस उपनिरीक्षक अशोक सावईकर यांच्या घरालगत हा प्रकार घडला होता. त्यानंतर वनखात्याचे अधिकारी दीपक तांडेल यांनी बिबट्या माडावरून सुखरूपपणे खाली उतरून जंगलाच्या दिशेने जावा, यासाठी संपूर्ण परिसर देखरेखेखाली ठेवला होता. रविवारी उशिरा रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बिबट्या माडावरून खाली उतरून डोंगराच्या दिशेने जंगलात पळाला. वनखात्याची टीम घटनास्थळावर ठाण मांडून बसली होती. या भागात केवळ बिबट्याच्या दर्शनासाठी दाखल होणाऱ्यांसाठी प्रवेशबंदी केली होती. लोकवस्तीतील सर्व ग्रामस्थांशी बैठक घेऊन घरातील टीव्ही, विजेची उपकरणे रात्री 10 वा. पासून बंद करण्याचा आदेश दिला होता. रस्त्यावरील पथदीप बंद करण्यात आले होते. तसेच घरातून कुणीच बाहेर पडू नये अशी विनंती करण्यात आली होती. वनखात्याचे अधिकारी रात्रभर पहारा देत होते. लांब व उंच पल्याचे चित्र सहज स्पष्टपणे दिसू शकेल अशा दुरबिणी, हेडलाईट, गोफिण, बाण व दारूगोळयासह वनखात्याचे अधिकारी सज्ज होते. रात्रीच्या वेळी बिबट्याची नजर तीक्ष्ण बनते. ज्याप्र्रमाणे तो नैसर्गिकरित्या माडावर चढला त्याप्रमाणे उशिरा रात्री घटनास्थळावर माणसांचा वावर कमी होताच तेथून सुखरूपरित्या जाणार असा अंदाज वनखात्याने दर्शविला त्याचप्रमाणे तो निसटला. काल सोमवारी सकाळी कुळण सावईवेरे येथील ग्रामस्थांना बिबट्या सुखरूपरित्या माडावरून जंगलात पळाल्याची महिती वनखात्यातर्फे देण्यात आली.









