पुणे / प्रतिनिधी :
कसबा पोटनिवडणुकीत भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटल्याचा आरोप कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी शनिवारी केला. या निवडणुकीमध्ये ‘लोकशाहीची हत्या’ झाल्याचे सांगत धंगेकर यांनी उपोषणाची भूमिका घेतली होती. मात्र, संबंधितांवर कारवाई करण्याचे पोलिसांनीआश्वासन दिल्यानंतर धंगेकर यांनी पाच तासानंतर उपोषण मागे घेतले. यावेळी धंगेकर यांच्यासोबत महाविकास आघाडीचे इतर कार्यकर्तेही उपस्थित होते.
धंगेकर म्हणाले, भाजपचे लोक पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटत होते. कसबा मतदार संघातील रविवार पेठ, गंज पेठ या सारख्या भागात भाजपने पैशांचे वाटप केले असून, या संपूर्ण प्रकारात पोलीस सहभागी आहेत. याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. ही एकप्रकारे लोकशाहीची हत्याच आहे, असे सांगत धंगेकर आज सपत्नीक कसबा गणपती मंदीरासमोर उपोषणाला बसले होते. मागील पंधरा दिवसापासून आम्ही हिरीरीने प्रचार करत आहे. मात्र, मागील सात दिवसापासून भाजपकडून लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कार्यकर्त्यांना बळजबरीने पोलीस ठाण्यात बसवून धमकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय गुंडांना हाताशी धरून विविध सोसायटीमध्ये फिरत मतदारांवर बळजबरी करण्यात येत आहे.
पोलीस खाते, निवडणूक आयोग यांच्याकडे आम्ही वेळोवेळी याबाबत तक्रारी केल्या मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पोलिसांच्या उपस्थितीत मतदारांना पैसे वाटप केले जात आहे, ही बाब लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे संविधानाचा आधार घेत आम्ही न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलो होतो. मात्र, संबंधितांवर कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आम्ही उपोषण मागे घेतले.








