मुंबईतील वरळी डोम येथे ‘मराठी विजय मेळाव्या’त राज-उद्धव यांचा एल्गार : सभेला विराट जनसमुदाय : मराठी अस्मितेची एकजूट
प्रतिनिधी / मुंबई
संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता होती, तो ठाकरे बंधूंचा मेळावा शनिवारी दि. 5 जुलै रोजी मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला. महाराष्ट्राला ज्या ऐतिहासिक क्षणाची प्रतीक्षा होती, तो क्षण वरळीतील डोममध्ये पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन राजकीयदृष्ट्या वेगळे झालेल्या ठाकरे बंधूंनी जवळपास 20 वर्षांनंतर एकत्र एका मंचावर येत राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे.
राज्यातील त्रिभाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द झाल्यानंतर या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ‘मराठी विजय मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र आल्याने, उपस्थित हजारो नागरिकांच्या साक्षीने मराठी अस्मितेचा आणि एकजुटीचा महत्त्वपूर्ण क्षण साकारला. या मेळाव्यात मराठी भाषा, संस्कृती आणि स्वाभिमानाचे समर्थन करत, राज्यातील नागरिकांना एकजुटीचा संदेश देण्यात आला. अनेक मराठी प्रेमींनी या ऐतिहासिक क्षणाला उपस्थित राहून साक्ष दिली. राजकीय भिन्नतेनंतर तब्बल दोन दशके वेगळे राहिलेल्या ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र येणे, हा केवळ भावनिक नव्हे तर राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा कट : राज ठाकरे
राज्यात हिंदी सक्तीची करण्याची काहीच गरज नव्हती. हा प्रश्नच अनाठायी होता. मात्र हिंदी सक्तीची करून त्याच्या आडून मुंबई स्वतंत्र करता येते का, याची चाचपणी ते करत होते. पण लक्षात ठेवा, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी कोणाची माय व्याली आहे, त्यांनी मुंबईला हात घालून दाखवावा. आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही गप्प आहोत असा नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी राज्यातील आणि पेंद्रातील भाजप सरकारला दिला. हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतल्याने मुंबईत वरळीतील एनएससीआय डोम येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठीजनांना साद घालत विजयी मेळावा घेतला. यावेळी राज ठाकरे बोलत होते.
या मेळाव्याला कोणत्याही पक्षाचा झेंडा नव्हता. केवळ मराठी हाच अजेंडा होता. त्यावेळी विविध पक्षाचे नेते सुद्धा या मेळाव्याला हजर होते. शिवाय सुमारे 20 वर्षानंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणार म्हटल्यावर शिवसेनाप्रेमी आणि मराठीजन मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते. एनएससीआय डोम सभागफह तुडुंब भरले होते.
महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय होते हे राज्यकर्त्यांनी पाहिले
हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरेंच्या मनसेने राज्य सरकारला दोन वेळा पत्र लिहिली. राज ठाकरे म्हणाले, आम्ही पत्र लिहिल्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे माझ्याकडे आले. ते म्हणाले ’माझे ऐकून तर घ्या’. त्यावेळी त्यांना सांगितले होते की, ऐकून घेईन. मात्र ऐकले नाही. पेंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राचा समाचार घेताना राज ठाकरे म्हणाले, त्रिभाषा सूत्र कुठे आहे. कोणत्या राज्यात आहे. न्यायालयांमध्ये इंग्रजीतच व्यवहार होतो. तिथेही इंग्रजीत ऐकले जाते. इतर कोणत्या राज्यातही त्रिभाषा सूत्र नाही. मात्र महाराष्ट्रात प्रयोग करू पाहत होते. पण महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय होते हे राज्यकर्त्यांनी पाहिले. विनाकारण आणलेला हा विष़य होता असे राज ठाकरे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, लालकृष्ण अडवाणी इंग्रजीत शिकले.
भाषेबाबत बोलण्यासारखे यांच्याकडे काही नाही तेव्हा ठाकऱ्यांची मुले इंग्रजी शाळेत शिकल्याचे लोकांच्या मनावर बिंबवायला लागले, असे म्हणत राज ठाकरे यांनी सांगितले की दादा भुसे मराठीत शिकले आणि ते महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस इंग्रजी शिकले आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, लालकृष्ण अडवाणी इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीबाबत, हिंदुत्वाबाबत शंका घ्याल का, असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला
मराठी माणूस एकत्र आल्याने जातीचे कार्ड खेळतील
हिंदीची सक्ती आणि मराठीला मिळणारी दुय्यम वागणूक या मुद्द्याना लक्ष्य करत राज ठाकरेंनी पुढचा धोका सांगितला. राज्यातील तमाम जनतेला सावध करत त्यांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला. महाराष्ट्रातील तमाम मराठी लोक आज एकत्र आली आहेत. मात्र आता हेच सरकार राजकारण करून तुम्हाला जाती -जातीत विभागतील. जातीचे कार्ड खेळतील. मराठी म्हणून तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही, असे सांगत राज ठाकरेंनी तमाम मराठी जनतेला एकजुटीचा, सावध राहण्याचा सल्ला दिला.
जे बाळासाहेबांना जमले नाही ते फडणवीसांनी केले
मोर्चाच्या चर्चेनंतर माघार घ्यावी लागली. खरंतर आजचाही मेळावा शिवतीर्थ मैदानात व्हायला हवा होता, मैदान ओसंडून वाहिले असते. पाऊस आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या जागा मिळत नाहीत. बाहेर उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यांना इथे यायला मिळालं नाही. मी माझ्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षांनंतर मी आणि उद्वव एकाच व्यासपीठावर येत आहोत. ज्या माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसांना जमलं,’ असे राज ठाकरेंनी म्हणताच लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला.

एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी : उद्धव ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाच्या सुऊवातीला उद्धव ठाकरे यांना सन्माननीय म्हटले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्या भाषणाच्या सुऊवातीला राज यांचे कतफ&त्व मोठे आहे, त्यामुळे मी सुद्धा त्यांना सन्मानीय राज ठाकरे असेच म्हणणार, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यावर सर्वांचे लक्ष भाषणाकडे आहे. परंतु भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणे याकडे सर्वांचे लक्ष आहे, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. तर, आमच्या दोघातील अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला, असा टोला लगावत आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलो. एकत्र राहण्यासाठी, असे मोठे आणि सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केले.
तर आम्ही गुंडगिरी करूच
उद्धव ठाकरे म्हणाले की, भाषेवरून जेव्हा एखादा विषय निघतो, तेव्हा तो विषय वरवरचा विषय नसतो. आम्ही दोघांनीही भाजपाचा अनुभव घेतलेला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. पण आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला (भाजपाला) फेकून देणार आहोत. भाजपा ही अफवांची फॅक्टरी आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, अशी टीका भाजपाने केली. पण आम्ही कडवट हिंदुत्ववादी आहोत. देवेंद्र फडणवीस जे सगळीकडे बोलले की, भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. मग जर महाराष्ट्रात न्याय मागण्यासाठी कोणी आंदोलन करत असेल आणि त्याला जर तुम्ही गुंडगिरी म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. जर गुंडगिरी केल्याशिवाय न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.
आता एकजूट महत्त्वाची
शेवटी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला आवाहन केले की, कोणत्याही पक्षाचे असू आपण एकजूट केली पाहिजे. भाजपच्या मराठी माणसानेही त्यात आले पाहिजे. ज्या राज्यात राहता, मातीत जन्माला आला त्याचे धिंडवडे काढणाऱ्याना पायघड्या टाकणार असू तर असे षंढाचे जीवन जगण्यापेक्षा मेलेले बरे. त्यामुळे भेदाभेद विसरून मराठी माणसांची एकजूट कायम ठेवा. तुटू नका, फुटू नका, मराठी ठसा पुसू नका असे भावनिक आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी काल दिलेल्या घोषणेचा संदर्भ देत तो एक गद्दार काल ‘जय गुजरात’ बोलला. किती लाचारी करायची? तो पुष्पा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. त्या चित्रपटातला हिरो दाढीवरती हात फिरवून म्हणतो, झुकेगा नहीं साला, तसं हे गद्दार म्हणतात उठेगा नही साला. कुछ भी बोलो उठेगाही नही. अरे कसे उठणार? म्हणजेच विचार वगैरे असं मी म्हणतोय म्हणत ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘जय गुजरात‘ अशी घोषणा देणारा बाळासाहेब ठाकरे यांचा पाईक असू शकत नाही. ‘हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांचा पाईक असू शकेल का? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर ‘जय गुजरात’ म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
भोंदूगिरीविऊद्ध लढणाऱ्यांचे आम्ही वारसदार
आता ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचे पाहिल्यावर अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला असेल. मग कोणी बाबांकडे गेले असतील. मिरच्या लिंबू फिरवत असतील. कोणी रेडा कापत असेल. कोणी गावाला गेला असेल. असल्या भोंदूगिऊद्ध आमच्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार आजही आम्ही एकत्र आहोत. यापुढेही एकत्र राहू, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.








