सेन्सेक्स 449 अंकांनी वधारत बंद : अदानींचा समभाग वधारला
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारातील मागील आठ दिवसांच्या घसरणीला अखेर विराम मिळाला असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये चालू आठवड्यातील तिसऱ्या दिवशी बुधवारी सेन्सेक्स 449 अंकांच्या मजबूत तेजीसोबत बंद झाला आहे. यावेळी अदानी एंटरप्रायझेसचे समभाग तब्बल 16 टक्क्यांनी वधारत बंद झाले.
बुधवारच्या सत्रात दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीमुळे मागील आठ सत्रांमधील घसरण थांबली. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 448.96 अंकांनी वधारुन निर्देशांक 59,411.08 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 146.95 अंकांच्या मदतीने निर्देशांक 17,450.90 वर बंद झाला.
विविध क्षेत्रातील समभागांनी तेजीचा प्रवास केला असून यामध्ये प्रामुख्याने धातू, पीएसयू बँक, ऑईल अॅण्ड गॅस, आयटी, कॅपिटल गुड्स, पॉवर आणि रियल्टी यांचे निर्देशांक हे बुधवारच्या सत्रात जवळपास 1 ते 2 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप यांचेही निर्देशांक एक-एक टक्क्यांनी वाढून बंद झाले आहेत.
अदानी मजबूत
राष्ट्रीय शेअर बाजारातील अदानी एंटरप्रायझेसच्या समभागात सर्वाधिक 15.78 टक्क्यांनी तेजी दिसून आली. धातून निर्देशांकही बुधवारी तेजीत होता. चीनमध्ये कोरोना निर्बंध हटून सर्व व्यवहार पूर्ववत झाले असून याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसला. यासह हिंडाल्कोचे समभाग 3.68 टक्के, यूपीएल 2.79 टक्के, स्टेट बँक 2.57 टक्के, इंडसइंड बँक 2.45 टक्क्यांच्या तेजीसोबत समभाग बंद झाले आहेत.
निफ्टीमध्ये ब्रिटानियाचे समभाग सर्वाधिक 1.83 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. तसेच पॉवरग्रिड, सिप्ला, बीपीसीएल व एचडीएफसी बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. सोबत आयटी निर्देशांकदेखील बुधवारी तेजीचा सूर पकडून होता. जागतिक बाजारांमध्ये अमेरिकेतील बाजार घसरणीत तर युरोपियन बाजार तेजीत होते. आशियाई बाजारात बहुतेक निर्देशांक तेजीत होते.









