प्रतिनिधी /मडगाव
फोंडा तालुक्यातील काही शाळांमध्ये स्वयंसहाय्य गटांकडून निकृष्ट दर्जाचा माध्यान्ह आहार पुरविला जात असल्याचे वृत्त दै. तरूण भारतमधून प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. निकृष्ट दर्जाचे माध्यान्ह आहार पुरविणाऱया अनेक स्वयंसहाय्य गटांचे धाबे दणाणले होते. मात्र, काल सोमवारी त्या स्वयंसहाय्य गटांनी समाधानकारक माध्यान्ह आहार पुरविल्याची माहिती हाती आली आहे.
केवळ फोंडा तालुक्यातच नव्हे तर इतर तालुक्यांनी देखील निकृष्ट दर्जाचा माध्यान्ह आहार पुरविला जात असल्याची माहिती पालकांकडून मिळाली. अवघेच स्वयंसहाय्य गट माध्यान्ह आहाराच्या बाबतीत सर्तक असतात. माध्यान्ह आहाराच्या बाबतीत तडजोड करू नये, जेणे करून छोटय़ा मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होणार नाही असे मत देखील पालकांकडून व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी इतर तालुक्यातील माध्यान्ह आहाराची टेस्ट घ्यावी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी आपल्या साखळी मतदारसंघातील प्रोग्रेस हायस्कूलला भेट देऊन माध्यान्ह आहाराची टेस्ट घेतली. विद्यार्थ्यांसोबत त्यांनी माध्यान्ह आहाराचा आस्वाद घेतला. त्या संदर्भातील फोटो सोशल मिडियावर व्हायरल होताच काँग्रेस पक्षाचे आमदार संकल्प आमोणकर यांनी ट्विटरच्या माध्यमांतून मुख्यमंत्र्यांनी इतर तालुक्यातील शाळांतील माध्यान्ह आहाराची टेस्ट करून पहावी. हे करताना त्यांनी आपण भेट देणार असल्याचे अगोदर शाळांना किंवा स्वयंसहाय्य गटांना कळवू नये असे म्हटले आहे. त्यांनी दै. तरूण भारतच्या वृत्ताचा संदर्भही दिला आहे.









