शहरासह उपनगरातील दरही गडगडले : वीज मीटर देणे पाच महिन्यांनंतरही बंदच, एनए लेआऊट असेल तरच भूखंड खरेदी
बेळगाव : शंभर रुपयांच्या बाँडवर भूखंड खरेदी केलेल्यांची डोकेदुखी वाढली आहे. पाच महिने उलटले तरी अद्याप हेस्कॉमकडून मिटर देणे बंद आहे. यामुळे बाँडवर भूखंड खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. प्लॉटचे दरही गडगडले असल्याने विक्रेतेही अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे एनए लेआऊट असेल तरच भूखंड खरेदी करा, असा सल्ला सरकारी अधिकाऱ्यांकडून दिला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामांना ब्रेक लावण्यासाठी एनए लेआऊट असेल तरच इमारत अथवा घर बांधण्याची परवानगी द्या व त्यानंतर त्यांना वीज मीटर व पाण्याचे कनेक्शन द्या, असे स्पष्ट केले होते. याचा आधार घेऊन राज्यातील ऊर्जा विभागाने बाँड खरेदीद्वारे वीज मीटर देणे बंद केले. एनए लेआऊट असेल तरी बांधकामापूर्वी परवानगी घेऊन टेम्पररी मीटर दिला जात आहे. बिल्डिंग बांधून पूर्ण झाल्यानंतर बिल्डिंग कम्पलिशन सर्टिफिकेट (सीसी) तसेच ऑक्युपिएन्सी सर्टिफिकेट (ओसी) दिल्यानंतरच पर्मनंट मीटर देण्याची सूचना करण्यात आली आहे.
शहराच्या दक्षिण भागाला फटका
शहराच्या उत्तर भागापेक्षा मध्य व दक्षिण भागाला हेस्कॉमच्या निर्णयाचा फटका बसला आहे. शहराच्या उत्तर भागात बुडा तसेच वसवलेली नगरे असल्याने मोठे रस्ते, तसेच एनए लेआऊट आहेत. त्यामुळे या नव्या निर्णयाचा शहराच्या दक्षिण भागाला सर्वाधिक फटका बसला. या भागामध्ये शंभर रुपयांच्या बाँडवर भूखंड खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. त्यामुळे मागील पाच महिन्यात केवळ 79 मिटरना मंजुरी देण्यात आली आहे.
प्लॉटचे दर गडगडले
मागील 10 ते 15 वर्षांत बेळगाव शहराच्या भोवताली शेतवडीत प्लॉट पाडून सर्रास विक्री केली जात होती. या प्लॉटची शंभर रुपयांच्या बाँडवर खरेदी करण्यात आली. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हेस्कॉमने 18 मार्च 2025 पासून वीज मीटर देणे बंद केले. याचा परिणाम बाँडवरील प्लॉट खरेदीला बसला आहे. एनए लेआऊट नसलेल्या भूखंडांचे दर कमालीचे गडगडले आहे. ज्यांनी यापूर्वी बाँडवर प्लॉट खरेदी केली आहे, त्यांच्याकडून विक्री करण्यासाठी प्रयत्न सुरू असून घेतलेल्या दरातही विक्री होत नसल्याचे चित्र दिसत आहे.
गैरसमजामुळे हेस्कॉम कार्यालयात गर्दी
1200 स्क्वेअर फूटपेक्षा लहान भूखंडांना मिटर दिला जाणार असल्याची चुकीची माहिती मिळाल्याने हेस्कॉम कार्यालयात ग्राहकांची गर्दी होत आहे. परंतु एनए लेआऊट अथवा बुडाने 20×30 व 30×40 प्लॉट टाकले होते. त्यांना चारी बाजुंना जागा सोडणे अशक्य असल्याने अशा भूखंडांबाबत राज्य सरकार नियमात शिथिलता आणण्याचा विचार करत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली तरी अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे हेस्कॉमने स्पष्ट केले आहे.
पाच महिन्यात केवळ 350 मीटरला मंजुरी
बिल्डिंग कम्पलिशन सर्टिफिकेट दिल्यानंतर पर्मनंट मिटर दिला जात आहे. त्यापूर्वी घर बांधणीसाठी महापालिकेच्या परवानगीचे पत्र असल्यास टेम्पररी मिटर दिला जात आहे. मागील पाच महिन्यांत शहरात केवळ 340 ते 350 वीज मिटर दिल्याची नोंद हेस्कॉमकडे आहे. एनए लेआऊट असलेल्या भूखंडांवर बिल्डिंग बांधण्यासाठी परवानगी दिली जात असल्याने टेम्पररी मिटर दिला जात आहे. यामुळे पर्मनंट मिटरपेक्षा टेम्पररी मिटरची संख्या अधिक आहे.
अनधिकृत भूखंडांना वीज कनेक्शन देणे पूर्णपणे बंद
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हेस्कॉम प्रशासनाने ओसी किंवा सीसी असेल तरच वीज कनेक्शन देणे सुरू ठेवले आहे. परंतु अनधिकृत भूखंडांना वीज कनेक्शन देणे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यभर या निर्णयाची अंमलबजावणी केली जात असून बेळगावमध्येही केवळ अधिकृत व मान्यताप्राप्त भूखंडांनाच यापुढे मिटर दिला जाणार आहे.
– ए. एम. शिंदे (साहाय्यक कार्यकारी अभियंता)









