वृत्तसंस्था/ अॅडलेड
यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत महिला हॉकी संघातील रविवारी येथे खेळविण्यात आलेली तिसरी आणि शेवटची कसोटी 1-1 अशी अनिर्णित राहिली. तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारताचा 2-0 असा पराभव केला.
रविवारी खेळविण्यात आलेल्या या हॉकी कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात 25 व्या मिनिटाला मॅडीसन ब्रुक्सने ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियाने भारतावर 1-0 अशी आघाडी मिळवली होती. 42 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि दीप ग्रेस एक्काने या संधीचा पुरेपूर फायदा घेत गोल नोंदवल्याने भारताला हा सामना बरोबरीत सोडवता आला. या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत आक्रमक खेळावर भर देत चेंडूवर अधिक वेळ ताबा राखला होता. दरम्यान या कालावधीत दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले होते पण भारताला या संधीचा फायदा उठवता आला नाही. दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी प्रतिआक्रमणे करत भारतीय बचावफळीवर दडपण आणण्यात यश मिळवले होते. याच कालावधीत ऑस्ट्रेलियाचे खाते ब्रुक्सने उघडले. खेळाच्या तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताने ऑस्ट्रेलियन बचावफळीवर दडपण आणले आणि त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला. 42 व्या मिनिटाला दीप ग्रेस एक्काने गोल नोंदवून आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांनी निर्णायक गोल करण्याचा प्रयत्न केला पण बचावफळीतील खेळाडूंची कामगिरी दर्जेदार झाल्याने हा सामना अखेर 1-1 असा अनिर्णित राहिला. भारतीय महिला हॉकी संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिका संपली असून आता भारतीय महिला हॉकी संघ येत्या गुरुवारी ऑस्ट्रेलियन अ संघाबरोबर सामना खेळणार आहे.









