सरबो सिंग, नितीन म्हात्रे, नितीन चंडेला, कार्तिकेयन, मनिकांत यांची उपस्थिती
बेळगाव : इंडियन बॉडी बिल्डींग व फिटनेस संघटना, कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना व बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 11 व्या सतीश शुगर क्लासिक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा शुक्रवार दि. 5 जानेवारी रोजी रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित अन्नोत्सवनिमित्त स्पर्धेचे सायंकाळी 5 वाजता सीपीएड मैदानावर अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा आयबीबीएफ मुंबई यांच्या मान्यतेनुसार 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90, 100, 100 किलोवरील वजनी गटात घेण्यात येणार आहे. यंदा या स्पर्धेचे अकरावे पर्व असून अंतिम फेरीत संपूर्ण भारतातील 150 नामवंत शरीरसौष्ठवपटू आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करणार आहेत. त्यामधून 100 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकंदरीत 23 लाख 5 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. यास्पर्धेत सर्व राष्ट्रीयस्तरावरील नोकरवर्ग, रेल्वे स्पोर्ट्स बोर्ड, ऑल इंडिया कोल आणि सेंट्रल रेव्हेन्यू बोर्ड अशा टॉप 34 युनिट्समधील शरीरसौष्ठवपटू भाग घेणार आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीयपदक विजेते सरबो सिंग, नितीन म्हात्रे, नितीन चंडेला, कार्तिकेयन, मनिकांत असे नामवंत देशातील शरीरसौष्ठवपटू सहभागी होणार आहेत, अशी माहिती बेळगाव शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष गंगाधर एम., बीडीबीबीएचे सेक्रेटरी आणि स्टेट पंच हेमंत हावळ, बीडीबीबीएचे खजिनदार आणि राष्ट्रीय पंच बसवराज अरळीमट्टी व बीडीबीबीएचे डायरेक्टर शेखर जानवेकर यांनी दिली आहे.









