पुणे / प्रतिनिधी :
अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी नियमित तीन प्रवेश फेरीचे वेळापत्रक राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केले असून, त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी 19 जुलै रोजी जाहीर होणार आहे. तर प्रवेशाची पहिली निवड यादी 25 जुलैला जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य सीईटी सेलने अभियांत्रिकी प्रवेशासाठी नोंदणी आणि ऑनलाइन अर्ज मागविले होते. अर्ज करण्याची अंतिम मुदत गुरुवारी सायंकाळी पाच वाजता संपली. अभियांत्रिकी प्रवेशासाठी 1 लाख 72 हजार 163 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 1 लाख 55 हजार 109 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चिती केली आहे. यंदा अभियांत्रिकीसाठी सुमारे 1 लाख 40 हजारच्या आसपास प्रवेशाची क्षमता आहे. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश फेरीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर राज्य सीईटी सेलने आज तीनही प्रवेश फेऱयांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
दरम्यान, पहिल्या फेरीनंतर दुसरी प्रवेश फेरी 29 जुलैपासून सुरू होणार असून, तिसरी प्रवेश फेरी 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे 25 ऑगस्टपर्यत अभियांत्रिकी प्रवेश पूर्ण करणे आवश्यक आहे, असे राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.








