बीडीएफए चषक फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित बीडीएफए चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या सोमवारी खेळविलेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यातून सेंट झेवियर्सने सेंटमेरी स्कूलचा 6-0 तर लव्हडेलने सेंटपॉल्सचा 3-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. लव्हडेल स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंट झेवियर्सने सेंट मेरीजचा 6-0 असा पराभव केला. या सामन्यात 10 मिनिटाला सेंट झेवियर्सच्या गौरांगच्या पासवर सुजनने पहिला गोल केला. 14 व्या मिनिटाला सिध्दारूढच्या पासवर गौरांगने दुसरा गोल केला. 22 व्या मिनिटाला झेवियर्सच्या सुजानने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 31 व्या मिनिटाला गौरांगच्या पासवन गौरवने चौथा गोल केला. 39 मिनिटाला गौरांग उच्चूकरच्या पासवर गौरवने पाचवा गोल केला. तर 41 व्या मिनिटाला गौरवच्या पासवर गौरांग उच्चूकरने सहावा गोल करून 6-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात सेंट मेरीज संघाना गोल करण्यात अपयश आले.
दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात गतविजेत्या सेंटपॉल्स संघाला लव्हडेल स्कूलने 3-1 असा पराभव केला. या सामन्यात 18 व्या मिनिटाला विनोदच्या पासवर सिध्दार्थने पहिला गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात सेंटपॉल्सच्या जोसेफ वाझने गोल करून 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. 38 व्या मिनिटाला लव्हडेलच्या विनुसने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. तर 42 मिनिटाला डेनेने तिसरा गोल करून लव्हडेलच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. सेंटपॉल्सने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्याला अपयश आले. मंगळवारी अंतिम सामना सेंट झेवियर्स व लव्हडेल यांच्यात सायं. 7 वा. होणार असून सामन्यानंतर बक्षिस वितरण होणार आहे.









