बीडीएफए चषक प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित बेळगाव प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीएफएने युनायटेड गोवन्सचा टायब्रेकरवर तर निपाणी एफसीने टिळकवाडी इलेव्हनचा 3-1 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. लव्हडेल स्कूलच्या टर्फ मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीएफएने युनायटेड गोवन्सचा टायब्रेकरमध्ये 5-4 अशा गोलफरकाने पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्या सत्राच्या 13 व्या मिनिटाला टीएफएच्या भूषणने गोल करण्याची नामी संधी दवडली. 15 व्या मिनिटाला युनायटेड गोवन्सच्या पृथ्वीराजने मारलेला वेगवान फटका टीएफएच्या गोलरक्षकाने उत्कृष्ट अडविला. 21 व्या मिनिटाला टीएफएच्या सुजलने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला.
35 व्या मिनिटाला युनायटेड गोवन्सच्या अनासने गोलपोस्टच्या डाव्या कोपऱ्यात उत्कृष्ट फटका मारला होता. पण टीएफएच्या गोलरक्षकाने आपल्या उजवीकडे झेप घेत तो अचूक अडविला. त्यामुळे पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले व अनेक संधी वाया दवडल्या. त्यामुळे निर्धारित वेळेत दोन्ही संघाचे गोलफलक कोरेच राहिल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये टीएफएने 5-4 अशा गोलफरकाने विजय मिळविला. टीएफएतर्फे भूषण, शुभम, विकी, सुजल व विनय नाईक यांनी गोल केले. तर युनायटेड गोवन्सतर्फे अनास, जॉय, पृथ्वीराज व वेदांत यांनी गोल केले. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात निपाणी एफसीने टिळकवाडी इलेव्हनचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.
या सामन्यात सहाव्या मिनिटाला टिळकवाडीच्या साहीलच्या पासवर ओमने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. सातव्या मिनिटाला निपाणीच्या करण मानेच्या पासवर जीत पुटाणकरने बरोबरीचा गोल करुन 1-1 अशी बरोबरी साधत सामन्यात रंगत निर्माण केली. 15 व्या मिनिटाला टिळकवाडी इलेव्हनच्या साहीलने गोल करण्याची नामी संधी दवडली. 21 व्या मिनिटाला निपाणीच्या जीत पुटाणकरच्या पासवर ऋषिकेशने गोल करुन 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. 28 व्या मिनिटाला ऋषिकेशच्या पासवर विनयने तिसरा गोल करुन पहिल्या सत्रात 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. हा सामना निपाणीने 3-1 असा जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना गुरुवार दि. 12 रोजी सायंकाळी 6 वाजता निपाणी एफसी विरुद्ध टीएफए यांच्यात खेळविला जाणार असून तिसऱ्या क्रमांकासाठी युनायटेड गोवन्स व टिळकवाडी इलेव्हन यांच्यात सायंकाळी 5 वाजता होणार आहे. सामन्यानंतर बीडीएफएच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.









