वृत्तसंस्था /राऊरकेला (ओडिशा)
हॉकी इंडियातर्फे येथे सुरु असलेल्या 2023 च्या कनिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत चंदीगड आणि मध्यप्रदेश यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य फेरीच्या सामन्यात चंदीगडने हरियाणाचा तर मध्यप्रदेशने ओडिशाचा पराभव केला. येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात चंदीगडने हरियाणाचा 3-1 अशा गोल फरकाने पराभव केला. चंदीगड संघातर्फे सुरींदरसिंगने 6 व्या आणि 59 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले. तर 12 व्या मिनिटाला दीपककुमारने 1 गोल केला. हरियाणा संघातर्फे रोशनने 60 व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदविला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत चंदीगडने हरियाणावर 2-0 अशी आघाडी मिळविली होती. दुसऱ्या उपांत्य सामन्यात मध्य प्रदेशने ओडिशाचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-4 (12-11) अशा गोल फरकाने पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. हा उपांत्य सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघ 4-4 असे गोल बरोबरीत होते. मध्य प्रदेशतर्फे मोहम्मद झैद खानने 14 व्या, अली अहमदने 17 व्या, मोहित कर्माने 29 व्या तर झमीर मोहम्मदने 39 व्या मिनिटाला गोल नोंदविले. ओडिशा संघातर्फे दीपक मिंजने 24 व्या, आकाश सोरेंगने 31 व्या, अनमोल एक्काने 39 व्या तर प्रताप टोप्पोने 54 व्या मिनिटाला गोल नोंदविले. निर्धारीत वेळेत दोन्ही संघ गोल बरोबरीत राहिल्याने पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन्ही संघांकडून एकूण 23 गोल नोंदविले गेले. मध्य प्रदेशतर्फे 12 तर ओडिशातर्फे 11 गोल नोंदविण्यात आले.









