वृत्तसंस्था/ मेलबोर्न
2024 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीतील जेतेपदासाठी रविवारी इटलीचा जेनिक सिनेर आणि रशियाचा माजी अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेता डॅनिल मेदव्हेदेव यांच्यात लढत होणार आहे. इटलीच्या सिनेरने सर्बियाच्या टॉप सिडेड नोव्हॅक जोकोविचचा तर रशियाच्या मेदव्हेदेवने जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेवचा पराभव केला.
पुरुष एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या उपांत्य सामन्यात इटलीच्या सिनेरने सर्बियाच्या जोकोविचचा 6-1, 6-2, 6-7(6-8), 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात सिनेरचा खेळ निश्चितच दर्जेदार आणि अचूक झाल्याची प्रतिक्रिया जोकोविचने व्यक्त केली. सिनेरने जोकोविचची 33 सामन्यातील विजयी घोडदौड खंडित केली. गेल्या वर्षी विम्बल्डन स्पर्धेत सिनेरला उपांत्य सामन्यात जोकोविचकडून हार पत्करावी लागली होती. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत सिनेरचा हा जोकोविचवरील तिसरा विजय आहे. आता ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे जेतेपद मिळविल्यास सिनेर हा इटलीचा पहिला पुरुष टेनिसपटू ठरेल. ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत आतापर्यंत इटलीच्या पुरुष किंवा महिला टेनिसपटूला जेतेपद मिळविता आलेले नाही. 22 वर्षीय सिनेरने जोकोविचला 25 वे ग्रँडस्लॅम जेतेपदापासून रोखले आहे.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेवचा 5-7, 3-6, 7-6(7-4), 7-6(7-5), 6-3 अशा पाच सेट्समधील लढतीत पराभव केला. मेलबोर्न पार्कच्या टेनिस कोर्टवर मेदव्हेदेवला 2021-2022 साली अंतिम सामन्यात अनुक्रमे सर्बियाचा जोकोविच आणि स्पेनचा राफेल नदाल यांच्याकडून हार पत्करावी लागली होती. अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील माजी विजेता मेदव्हेदेव याची रविवारी इटलीच्या सिनेरबरोबर तिसऱ्यांदा गाठ पडत आहे.









