वृत्तसंस्था/ कटक
येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या ओडिशा मास्टर्स सुपर 100 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि सतीशकुमार करुणाकरन यांच्यात पुरूष एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल. आयुषने इंडोनेशियाच्या फरहानचा तर सतीशने विद्यमान विजेत्या किरण जॉर्जचा पराभव केला.
शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात भारताच्या आयुष शेट्टीने इंडोनेशियाच्या फरहानचा 19-21, 21-14, 22-20 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. आयुष शेट्टीने विश्व कनिष्ठांच्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कास्यपदक मिळविले होते. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सतीशकुमार करुणाकरनने विद्यमान विजेत्या किरण जॉर्जचा केवळ 41 मिनिटांच्या कालावधीत 21-18, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेमध्ये मिश्र दुहेरीत भारताच्या तनिशा क्रेस्टो आणि ध्रुव कपिला यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविताना उपांत्य सामन्यात डेन्मॉर्कच्या व्हेस्टरगार्ड आणि क्रिस्टेनी बुशचा 21-14, 21-14 असा पराभव केला.









