शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार
प्रतिनिधी/ बेळगाव
लष्करी वाहन दरीत कोसळून नागालँडमध्ये हौतात्म्य पत्करलेल्या निंग्यानट्टी, ता. बेळगाव येथील वीर जवान रवी यल्लाप्पा तळवार (वय 35) यांच्या पार्थिवावर शनिवारी शोकाकूल वातावरणात व शासकीय इतमामात जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
आसाम रायफल्स-40 बटालियनमध्ये सेवेत असलेला रवी तळवार हा जवान 8 जानेवारी रोजी लष्करी वाहन दरीत कोसळून मृत्युमुखी पडला होता. शनिवारी त्याचे पार्थिव बेळगावला आले. निंग्यानट्टी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गांवरून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वीर जवान रवी अमर रहें’च्या घोषणा देण्यात आल्या.
रवीचे पार्थिव निंग्यानट्टीला नेताना कंग्राळी खुर्द, अलतगा, अगसगा, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, हंदिगनूर, बोडकेनट्टी, कुरिहाळ आदी गावांमध्ये नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले. पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली. अगसगे येथील गावकरी व शाळकरी मुलांनी रवीच्या पार्थिवाला अखेरचे नमन केले. यावेळी केपीसीसीचे सदस्य मलगौडा पाटील, अप्पय्यगौडा पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष अमृत बुद्धण्णावर, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रवी मधाळे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष नागेंद्र लाड आदी उपस्थित होते.
रवीचे पार्थिव निंग्यानट्टी येथे पोहोचल्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे आदींसह उपतहसीलदार व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली. निंग्यानट्टी येथील बसनगौडा हुद्दार, भीमराय नाईक, सुरेश हंजी, सिदराय नाईक, संतोष नाईक आदी प्रमुखांनी श्रद्धांजली वाहिली. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे चिरंजीव राहुल जारकीहोळी यांच्यासह अनेक नेते अंत्यक्रियेत सहभागी झाले होते. बंबरगे ग्राम पंचायतीचे अध्यक्ष व सदस्यांनीही अंत्यक्रियेत भाग घेतला होता. पार्थिव गावात पोहोचताच वडील यल्लाप्पा, आई सिद्धव्वा, पत्नी सुप्रिया, मुलगा सुप्रित, मुलगी प्रिया व लष्करीसेवेत असलेला भाऊ शिवू, आणखी दोघे भाऊ संजीव व बसवराज यांच्यासह कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.









