गुहागर / सत्यवान घाडे :
गेली चार वर्षे भूसंपादन प्रक्रियेत अडकलेल्या गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शहरातून जाणाऱ्या मुख्य नाका ते 1,500 मीटरपर्यंतच्या जागेचा अंतिम निवाडा मंजूर झाला आहे. शहरातील 100 खातेदारांना मोबदला वाटपासाठीच्या नोटिसीचे वितरण सुरू झाले आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गामधील गुहागर शहरातील पहिली भूसंपादन प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील आतापर्यंतचे रामपूर ते गुहागर शासकीय विश्रामधामपर्यंत काँक्रिटचे बहुतांशी काम झाले आहे. मात्र काम करण्यापूर्वी यापैकी एकाही जागेचे रितसर संपादन करण्यात आले नव्हते.
मात्र शहरातील रस्ता रुंदीकरण करताना प्रथम भूसंपादन करा, त्यानंतर रस्त्याचे काम सुरू करा, असा पवित्रा येथील रस्त्यासाठी जागा जाणाऱ्या खातेदारांनी घेतला होता. भूसंपादन केलेल्या या मागणीची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाला तब्बल 4 वर्षे लागली. तरीही अजून 300 मीटरच्या जागेची कोणतीच संपादन प्रक्रिया झालेली नाही. गुहागर शहर नाक्यावरील श्रीदेव व्याडेश्वर देवस्थानशेजारील दुकानांचा प्रश्न ऐरणीवर होता. यामुळे सुरुवातीला रस्ता रुंदीकरण बसस्थानकापर्यंत होणार, असेही बोलले जात होते. मात्र भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता येथील जागा मोकळी होणार आहे. मुख्य शहर नाका ते 1,500 मीटरपर्यंतच्या भूसंपादन प्रक्रियेमुळे रस्त्याच्या कामाला गती निर्माण होणार आहे.
दरम्यान, 100 खातेदारांना 3 कोटी 36 लाख 76 हजार 611 एवढ्या रकमेचा अंतिम निवाडा मंजूर करण्यात आला आहे. त्या-त्या खातेदाराला त्या जमिनीच्या वाटपाची नोटीस देऊन हा अहवाल आपल्या कार्यालयाकडे सादर करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी चिपळूण यांनी केला आहे.
- अंतिम निवाडा मोबदला नव्या धोरणानुसारच
या दिलेल्या मोबदल्यामध्ये नक्की दर किती देण्यात आला आहे, याचा उलगडा होत नाही. दिलेल्या मोबदल्यामध्ये जागेची व इमारतीची किती रक्कम, याचाही उलगडा होत नाही. यामुळे मोबदला स्वीकारणारे खातेदार आता यावर कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. मात्र अखेर शहरातील भूसंपादनातील अंतिम निवाडा मोबदल्याच्या नव्या धोरणानुसारच झाला असल्याचे पहावयास मिळत आहे.








