कराड :
शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना देखावे सादर करण्यासाठी गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाची मुदत देण्यात येणार आहे.
याबाबत मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी यास मान्यता दिली असून लवकरच प्रशासनाला याबाबतचे आदेश प्राप्त होतील, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव व, रणजीत पाटील, पै. संतोष वेताळ, माजी सभापती स्मिता हुलवान, विजय वाटेगावकर, राजेंद्र माने उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या दोन दिवसांपूर्वीच्या कराड दौऱ्यात शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या पुढाकाराने शहरातील गणेश मंडळांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन उत्सवाच्या अनुषंगाने काही मागण्या केल्या होत्या. त्यात देखावे सादर करण्यासाठी शेवटचे पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत मुदत देण्याची मागणी होती.
याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. गतवर्षी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना मंडळांना देखावे सादर करण्यासाठी शेवटचे पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. यावर्षी अद्याप तसे आदेश देण्यात आलेले नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले असता त्यांनी यास तत्काळ संमती दिली. प्रशासनाला तसे आदेश देण्यात येतील, असे सांगितले असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. प्रशासनाला याचे लेखी आदेश लवकरच प्राप्त होतील, असेही पालकमंत्री म्हणाले.
दरम्यान पालकमंत्री देसाई यांच्या या घोषणेचे सर्व मंडळांनी स्वागत केले आहे. पत्रकार परिषद संपल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नामदार देसाई यांचा सत्कार केला. याप्रसंगी माजी सभापती विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, निशांत ढेकळे, राहुल खराडे, विनोद भोसले, गजेंद्र कांबळे, ओमकार मुळे, पै. संतोष वेताळ, राजेंद्र माने, सुलोचना पवार, चांदणी मुळे, रणजीत पाटील, मोहन कदम, रुपेश मुळे, गणेश कापसे, गणेश काटकर, अक्षय पवार, जय सूर्यवंशी, अथर्व सोनवले, महेश जाधव ,प्रसाद कुलकर्णी, विशू दसवंत, किशोर मोहिते, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- पालकमंत्र्यांच्या धडाडीची कराडकरांना प्रचिती -यादव
कराडमधील मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन काही मागण्या केल्या होत्या. त्यावर पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून तातडीने मंडळांना देखाव्यांसाठी रात्री बारा वाजेपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मंडळांना फायदा होणार आहे. यातून पालकमंत्र्यांच्या धडाडीची प्रचिती कराडकरांना आली असून सर्व कराडकरांच्या वतीने पालकमंत्र्यांचे आभार मानत असल्याचे राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले..








