रविना टंडन अन् सतीश कौशिकचा चित्रपट
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते सतीश कौशिक आणि अभिनेत्री रविना टंडन यांची मुख्य भूमिका असलेला अन् अरबाज खानकडून निर्मित चित्रपट ‘पटना शुक्ला’चे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. चित्रिकरण पूर्ण झाल्यानिमित्त चित्रपटातील कलाकारांच्या पूर्ण टीमने अरबाज खानच्या घरी पार्टी केली आहे. या पार्टीत सलमान खान देखील सामील झाला. या पार्टीची छायाचित्रे सतीश कौशिक यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत.

या छायाचित्रांमध्ये सलमान, सोहेल, अरबाज हे सतीश कौशिकसोबत दिसून येत आहेत. एका छायाचित्रात सतीश कौशिक अन् रविना हे दिसून आले. या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून लवकरच तो प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ओटीटीवर झळकणार का चित्रपटगृहात हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. या चित्रपटाद्वारे रविना टंडन दीर्घकाळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘पटना शुक्ला’ चित्रपटात रविना टंडन, सतीश कौशिक यांच्यासह मानव विज, चंदन रॉय सान्याल, अनुष्का कौशिक, जतीन गोस्वामी हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक बुडाकोटी यांनी केले आहे. या चित्रपटाची कहाणी सामाजिक मुद्दय़ावर आधारित असणार आहे.









