कला फिल्म प्रोडक्शनतर्फे चित्रीकरण : स्थानिक कलाकारांना संधी, प्रशांत पाटील यांच्याकडून माहिती
बेळगाव : कला फिल्म प्रस्तृत बेळगावात राजा श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज व बेळवडी मल्लम्मा सावित्री यांच्या जीवनावर आधारित कन्नड व मराठी भाषेमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण केले जाणार आहे. तब्बल 9 कोटी रुपये खर्चून जानेवारी 2026 पासून या चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होणार असून चित्रपटातील 80 टक्के कलाकार हे स्थानिक बेळगावचे असतील, असे चित्रपटाचे निर्माते लाईन प्रोड्युसर प्रशांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गुरुवारी येथील एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निर्माते प्रशांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर सानिका आचार्य, स्पर्श पाटील उपस्थित होते.
यावेळी प्रशांत पाटील म्हणाले, कला फिल्म प्रस्तुत राजा श्री शिव छत्रपती महाराज व बेळवडी मल्लम्मा सावित्री यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण बेळगाव, खानापूर व चंदगड तालुक्यामध्ये केले जाणार आहे. स्थानिक हौसी तसेच नवोदित कलाकारांना चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी दिली जाणार आहे. बेळगावात मोठ्या संख्येने शिवभक्त लाठीमेळा, तलवारबाजी, घोडेस्वार तसेच मर्दानी खेळ खेळण्यात अनेकजण तरबेज आहेत. त्यामुळे अशा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटांबाबत बारकाईने अभ्यास सुरू आहे. चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी संगीतकार दिग्दर्शक व निर्माता अवधूत गुप्ते यांच्याशी संपर्क झाला आहे. मीडिया पब्लिसिटी पार्टनर झी स्टुडिओ व जिओ स्टुडिओ असणार आहे. तसेच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची साथ देखील आपणाला असल्याचे त्यांनी सांगितले.









