कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
कोल्हापूर चित्रनगरीला पुर्वी कलेची पंढरी म्हणून ओळखले जाते. चित्रपट आणि मालिकांच्या चित्रिकरणासाठी कोल्हापुरातील चित्रपटनगरीत येत होते. परंतू अचानक सर्वच चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण मुंबईत होवू लागले. कोल्हापुरातील कलाकार आणि तंत्रज्ञांवर उपासमारीची वेळ आली होती. परंतू माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नामुळे राज्य शासनाकडून चित्रनगरीत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये अद्ययावत रेल्वेस्टेशन, वाडा, चाळ, मंदिर, घाट, वसतिगृह, बंगला आदी सुविधा उपलब्ध आहेत. सध्या चित्रनगरीत ‘जुळली गाठ आणि आई तुळजा भवानी’ या दोन मालिकांचे चित्रिकरण सुरू आहे. एकूणच सध्या चित्रनगरी साऊंड कॅमेरा, अॅक्शनसाठी तयार आहे. त्यामुळे आणखी दोन मालिकांच्या निर्मात्यांनी विचारणा केली आहे.
कोल्हापुरातील चित्रनगरीमध्ये प्रत्येक दोन एकरमध्ये निर्माता, दिग्दर्शकाला पाहिजे तसा शुटींगचा सेट उभारण्यास परवानगी दिली जाते. सध्या पाटलाचा वाडा, चाळ, वसतिगृह, रेल्वेस्थानक, रस्ते, बंगल्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच आणखी 44 कोटीचा निधी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाला आहे. या निधीतून आणखीन सुविधा पुरवल्या जाणार आहेत. सध्या चित्रिकरणासाठी पूरक सुविधा चित्रनगरीत आहेत. केएमटी थांबा, नवीन बांधलेला वाडा त्यासमोर दोन पार तयार केले आहेत. तसेच ग्रामीण भाग दाखवण्यासाठी जुन्या पध्दतीची घरे, झोपड्या, शेड आदी सुविधा निर्माण केल्या आहेत. सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असे नव्याने मंदिर व मंदिरानजीन घाट तयार करण्यात आला आहे. तसेच यात्रा भरलेला प्रसंग दाखवण्यासाठी खाऊंच्या स्टॉलसाठी जागा, मंदिराच्या भवती फेऱ्या मारण्यासाठीची सुविधा आहे. त्यामुळे या मंदिरात कोणत्याही प्रकारच्या यात्रेचे चित्रिकरण करता येणार आहे.चित्रनगरीच्या प्रवेशव्दारापासून संपूर्ण 78 एकरमधील अंतर्गत काही परिसरात रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे.

तसेच चित्रिकरणासाठी लागणारी सर्व लोकेशन येथे उपलब्ध आहेत. एका वसतिगृहात 20 व दुसऱ्या वसतिगृहात 40 रूम असल्याने येथे 200 कलाकार, तंत्रज्ञांच्या राहण्याची सोय होवू शकते. सध्या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून येत्या काही महिन्यात वसतिगृह राहण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच अद्ययावत रेल्वेस्टेशन तयार केले असून बसण्यासाठीचे बाकडे, तिकिटघर, जिना, दोन डबे मावतील येवढा रेल्वेट्रॅक तयार केला असून यावर फक्त रूळ घालणे बाकी आहे. या रेल्वेस्टेशनचे काम पाहून साऊथ इंडियन निर्माते, दिग्दर्शन चौकशी करू लागले आहेत. रेल्वेस्टेशन नजीकच मोठा पूल बांधण्याचे काम सुरू असून या पुलाचाही चित्रिकरणासाठी उपयोग केला जाणार आहे. चित्रनगरीत असणाऱ्या छोट्या दऱ्या-खोऱ्यासुध्दा हिरव्यागार झाल्या आहेत. तसेच येथील जैवविविधतेमध्ये मुख्य म्हणजे मोरांची संख्या अधिक आहे. नव्याने दोन फ्लोअर केल्याने सध्या तीन फ्लोअर उपलब्ध आहेत. न्यायालय, कोर्ट, चाळ, तसेच जुन्या पाटलाच्या वाड्यात कॉन्फरन्स हॉल आणि दोन ऑफिस केबिनही तयार केल्या आहेत.
मुख्य प्रवेशव्दार, सोलर सिस्टिम बसवण्यात आली आहे. साहित्य ठेवण्यासाठी भाडे तत्वावर देण्यासाठी तीन गोडावून तयार केली आहेत. विद्युतीकरण, पाणीपुरवठा, सोलर सिस्टम, संरक्षक कठडे तयार केले आहेत.

- प्रस्तावित कामे
चित्रनगरीत पर्यटकांसाठी उपहारगृह, एक हजार क्षमतेचे अॅम्पिथियटर बांधायचे आहे. मिनी थियटर, विश्रामगृह, चार एकर जागेत रोज गार्डन तयार केली जाणार आहे. दोन शेततळी, दहा ठिकाणी गजेबो व सेल्फी पॉइंटस, एक किलोमीटरचा कच्चा घाट रस्ता, दहा हजार झाडांचे सिंचन व्यवस्थेस मीयावाकी जंगल तयार केले जाणार आहे. चार ठिकाणी ओपन लोकेशन तयार करावयाचे आहे. नवीन मॅझिक स्टुडीओ, चार क्लासरूम, प्रदर्शन कक्ष आणि तालिम दालने तयार केली जाणार आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय व निवासस्थान, चित्रपटविषयक संग्रहालय, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा तयार केली जाणार आहे.
- कलाकारांसह चित्रपट महामंडळाच्या सदस्यांच्या मागण्या
चित्रनगरीमध्ये चित्रपट व्यवसायाची समज असलेली व्यक्ती कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावी. चित्रनगरीतील व्यवसाय व सोयी-सुविधा लक्षात घेवून चित्रनगरीमधील चित्रिकरणाचे दर परवडणारे असावेत. चित्रनगरीतील अपूर्ण सेट त्वरीत पूर्ण करून मिळावेत. चित्रनगरीचे पर्यटनस्थळ न करता चित्रिकरणासाठी सोयी उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून चित्रनगरीचे उत्पन्न कोल्हापूरमधील व्यवसाय वाढेल. सध्या उपलब्ध असलेले दोन्ही फ्लोअर चित्रिकणासाठी दिले आहेत. त्यामुळे नव्वद बाय शंभरचे आणखी दोन फ्लोअर व शंभर बाय दीडशेचे दोन फ्लोअर बांधून मिळावेत. अद्यावत कँटींन, रेस्टारंट सेट लवकरात लवकर मिळावा. एअरपोर्ट अथॉरिटीच्या नियमानुसार ज्या भागात बांधकाम करता येत नाही अशा भागात गार्डन व जंगल उपलब्ध करून द्यावे. चित्रपट व्यवसायात असलेल्यांना विश्वासात घेवून त्यांच्या सल्ल्यानुसार सेटची बांधणी करावी.
- चित्रिकरणासाठी उपलब्ध लोकेशन
कोल्हापुरात चित्रनगरी, पंचगंगा नदी, शिवाजी विद्यापीठ, दऱ्या खोऱ्या, पन्हाळा, विशाळगड, राधानगरी, काळम्मावाडी धरणासह चित्रीकरणासाठी केत्येक स्थळे आहेत. अंबाबाई मंदिर, नृसिंहवाडी अशी धार्मिक स्थळे आहेत. स्क्रिनिंग थिएटरही उभारले जाणार आहे. हॉटेल्स, उद्योग, व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने चित्रीकरणासाठी कोणतीही अडचण येत नाहीत. तसेच स्थानिक कलाकार आणि दर्जेदार काम करणारे तंत्रज्ञ आहेत.
- सध्या 140 कलाकार, तंत्रज्ञांना रोजगार
चित्रनगरीमध्ये सध्या जुळली गाठ आणि आई तुळजा भवानी या दोन मालिकांचे चित्रिकरण सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक मालिकेत 70 अशा 140 कलाकार, तंत्रज्ञांना रोजगाराची संधी मिळाली आहे. येत्या काही दिवसात आणखी दोन मालिकांचे चित्रिकरण चित्रनगरीत होणार आहे. त्यामुळे आणखी कलाकार, तंत्रज्ञांना रोजगाराची संधी मिळणार आहे.








