चित्रपटविषयक खरेदी-विक्रीला संधी, चित्रपटासंबंधित चर्चा
प्रतिनिधी /पणजी
मिरामार येथील मेरीएट रिसोर्टमध्ये नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा (एनएफडीसी) ‘फिल्म बाजार’ सुरू झाला असून तो एकूण 5 दिवस म्हणजे 20 ते 24 नोव्हेंबर असा चालरणार आहे. चित्रपट खरेदी-विक्री करण्याचे हे एक प्रकारचे व्यासपीठ अर्थात मार्केट असून त्यात विविध देशांचे, भाषांचे चित्रपट समाविष्ट करण्यात आले आहेत.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने हा ‘फिल्म बाजार’ आयोजित करण्यात आला असून त्यात चित्रपटांशी संबंधित विविध विषयावर परिसंवाद-चर्चा सत्रे यांचा समावेश आहे. विविध राज्ये, देशांची दालने त्या फिल्म बाजारात सहभागी झाली असून त्यास देश विदेशातील प्रतिनिधींचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती एनएफडीसीच्या प्रवक्त्याने दिली.
यंदाच्या फिल्म बाजारात काही सुधारणा करण्यात आल्या असून नवीन-कार्यक्रम-उपक्रम यांनाही स्थान देण्यात आले आहे. फिल्म बाजारमध्ये चित्रपट विक्रीदार, खरेदीदार त्यांचे एजंट व एजन्सी यांची नोंदणी चालू असून अनेक बाजारातील चित्रपट स्थानिक भाषेत असले तरी इंग्रजीत त्यांचा अनुवाद करण्यात आला आहे. अनेक निर्माते, दिग्दर्शक, चित्रपट उद्योगातील कंपन्या यांनी आपापले नवीन विविध प्रकारचे चित्रपट बाजारात आणले असून 24 नोव्हेंबरपर्यंत त्यांची खरेदी, विक्री होणार असल्याचे एनएफडीसीच्या सुत्रांनी सांगितले.
फिल्म बाजारासाठी मोठय़ा संख्येने चित्रपटांच्या प्रवेशिका असून त्यांची थोडक्यात माहिती तेथे प्रदर्शित करण्यात येणार आहे. ती पाहून नंतर त्यांची खरेदी-विक्री होणार आहे. फिल्म बाजारात विविध विभाग असून काही चित्रपट पूर्ण दाखवण्यात येणार आहेत तर काही थोडक्यात प्रदर्शित होतील. त्यांचे वेळापत्रक बाजारात उपलब्ध करण्यात आले असून चित्रिकरणासाठी आवश्यक असलेल्या विविध देश-विदेशातील ठिकाणांचे प्रदर्शन त्यांची दालनेही येथे समाविष्ठ आहेत.
स्क्रीन रायटर्स लॅब, को-प्रॉडक्शन मार्केट, प्रदर्शनीय रूम, शिफारस विभाग, नॉलेज सिरीज असे विविध विभाग बाजारात समाविष्ठ आहेत.








