मात्र, कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
कन्नड सिनेअभिनेते सुदीप हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी आपण निवडणूक लढविणार नसून कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले आहे. आपल्याला कठीण प्रसंगी सहकार्य केलेल्याबद्दल आपण निवडणुकीत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना पाठिंबा दर्शविणार असून त्यांच्यावतीने प्रचार करणार आहे. ते सूचवतील त्या ठिकाणी प्रचार करेन, असेही सुदीप यांनी स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेते सुदीप यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यामुळे सुदीप काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, नंतर त्यांनी याविषयी स्पष्ट केल्यानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. दरम्यान, तीन दिवसांपासून सुदीप भाजपातत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे बुधवारी बेंगळूरमधील एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यासमवेत सुदीप यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, लहानपणापसूनच बोम्माई यांना पहात आलो आहे. चित्रपटसृष्टीत जेव्हा जेव्हा अडचणीत होतो, तेव्हा तेव्हा ते माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे होते. चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तेव्हा आपल्याला कोणीही गॉडफादर नव्हता. मात्र, अनेकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे आपणे वैयक्तिकपणे बोम्माईंच्यावतीने प्रचार करेन. ते सूचवतील त्या ठिकाणी प्रचार करणार आहे. आपण कोणत्याही पक्षाच्या बाजूने नाही. बोम्माई यांनी बोलावले म्हणून आपण येथे आलो आहे. कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, असे अभिनेते सुदीप यांनी सांगितले आहे.
याप्रसंगी मुख्यमंत्री बोम्माई यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. सुदीप यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांचा आपल्याला पाठिंबा म्हणजेच भाजपला पाठिंबा दिल्यासारखे आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सुदीप यांच्या भूमिकेला आपला आक्षेप नाही, असे म्हटले आहे. तर माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सुदीप यांनी भाजपच्यावतीने प्रचार केला तरी त्याचा प्रभाव पडणार नाही. निवडणूक येताच अनेक सिनेकलाकार प्रचार करतात, अशी प्रतिक्रिया दिली आहे.









