प्रतिनिधी / जोयडा
एन. एच. 4 ए (बेळगाव-पणजी) महामार्गावर येणाऱया खानापूर ते अनमोड रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. त्यामुळे रामनगर, अनमोड, तिनईघाट, लोंढा, गुंजी भागातील जनतेतून, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कंत्राटदार शांतगौडर यांनी वर्क ऑर्डर मिळण्याची वाट न पाहता, रामनगर व इतर गावातील नागरिकांनी केलेल्या जोरदार मागणीमुळे गुरुवार दि. 18 रोजी कामास प्रारंभ केला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या हुबळी विभागाचे प्रोजेक्ट डायरेक्टर (प्रकल्प संयोजक) यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर-अनमोड रस्त्याच्या कामास प्रारंभ केला. सुरुवातीला मुरुम मिश्रीत खडीने खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे वाहनांना सुरळीतपणे संचार करण्यास होण्यास मदत होणार आहे.
कामास प्रारंभ झाल्याने माजी ता. पं. सदस्य, माजी ग्रा. पं. सदस्य, सत्तारुढ व विरोधी पक्षाचे ग्रा. पं. सदस्य व सामाजिक संघटनांतून समाधान व्यक्त होत आहे. वर्क ऑर्डर आल्यानंतर पुढील कामे पूर्ण करावीत, अशी मागणी रामनगर जनतेतून होत आहे.
खानापूर ते अनमोडपर्यंतचा मार्ग पूर्णतः खराब झाल्याने सदर मार्ग लहान वाहनांना बंद पडण्याच्या स्थितीत होता. त्यामुळे परिसरातून संताप व्यक्त करून उग्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. याविषयी हुबळीतील महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाकडे विचारणा करण्यात आली असता मार्ग दुरुस्तीसाठी वर्क ऑर्डर मिळण्यासाठी दिल्लीतील मुख्य कार्यालयाकडून परवानगी मिळणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आले होते. मात्र, कंत्राटदार शांतगौडर यांनी वर्क ऑर्डरची वाट न पाहता रस्ता दुरुस्तीला प्रारंभ केला आहे.









