बेळगाव : मागील वर्षभरापासून ग्राम पंचायतमध्ये काम करणाऱ्या काहींना बढती देण्यात आली नाही तर रिक्त असलेल्या जागाही भरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे संबंधित ग्राम पंचायतमधील रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी कर्नाटक राज्य ग्राम पंचायत नोकर संघाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तालुक्यातील 10 ग्राम पंचायतींमध्ये संगणक ऑपरेटर, लिपीक, ग्रेड 2 सचिव ही पदे रिक्त आहेत. मात्र ती भरती करून घेण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या जागा रिक्त असल्याने त्या कामांचा भार संबंधित ग्राम पंचायतमधील कर्मचाऱ्यांवर पडत आहे. मागील वर्षभरापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आलो आहे. मात्र अजूनही याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे तातडीने ही नेमणूक करावी, अशी मागणीही करण्यात आली. तालुक्यातील बंबरगा, हंदिगनूर, धामणे एस., कुद्रेमनी, होनगा, आंबेवाडी, उचगाव, काकती, न्यू वंटमुरी, सुळगा (हिं.) या गावातील डाटा एन्ट्री ऑपरेटरांची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे मोठा त्रास होत आहे. याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांची बढती झाली आहे त्यांना बढतीही द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. तालुका पंचायतच्या सहाय्यक सचिव गणेश कलाले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष नाईक, उपाध्यक्ष जितेंद्र कागणकर, काशी कांबळे, सुनील पमसोटी यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
बेंगळूरच्या मोर्चाला जाणार
अनेक वर्षांपासून ग्राम पंचायतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे, सेवेमध्ये कायम करण्यात यावे, महागाईनुसार वेतनवाढ करण्यात यावी, पेन्शन सुविधा लागू करण्यात यावी, सेवा ज्येष्ठतेनुसार बढती द्यावी, अशा विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी ग्राम पंचायत कर्मचारी बेंगळूर येथे होणाऱ्या मोर्चासाठी जाणार आहेत. तेंव्हा त्यांना त्रास होवू नये यासाठी प्रयत्न करण्याचेही यावेळी सांगण्यात आले.









