अन्यथा तीव्र आंदोलनाचा युवा रक्तदाता संघटनेचा इशारा
ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीतील तंत्रज्ञ (टेक्निशियन) पदे रिक्त असल्यामुळे केवळ दोन जणांवरच या रक्तपेढीचा भार आहे. त्यात सध्या एक टेक्निशियन रजेवर गेल्यामुळे एकाच्या जीवावरच ही रक्तपेढी सुरू आहे. ही रिक्त पदे भरण्याबाबत अनेक वेळा लक्ष वेधुनही दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनच सावंतवाडीची ही ब्लड बँक बंद करण्याचा घाट घालत आहे. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत किमान एक तरी टेक्निशियन रुजू न झाल्यास सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासमोर जिल्हा वैद्यकीय प्रशासनाच्या निषेधार्थ काळी फीत बांधून सावंतवाडी तालुक्यातील रक्तदात्यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.
सध्या जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत ८ टेक्निशियन असताना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये केवळ दोनच टेक्निशियन आहेत. रक्तपेढीतील या रिक्त पदामुळे रुग्णांसह नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. युवा रक्तदाता संघटनेने याबाबत जिल्हा आरोग्य प्रशासनाचे अनेक वेळा लक्ष वेधले. परंतु प्रशासनाच्या उदासीन भुमिकेमुळे रिक्त पदांचा हा प्रश्न जैसे थे आहे. त्यामुळे ही रिक्त पदे न भरण्यामागे सावंतवाडीची ब्लड बँक बंद करण्याचा प्रशासनाचा डाव तर नाही ना? असा संतप्त सवाल करीत याला जिल्हा शल्य चिकित्सक जबाबदार असल्याचा आरोप देव्या सुर्याजी यांनी केला आहे.
याबाबत देव्या सुर्याजी म्हणाले, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये सध्या दोनच टेक्निशियन असुन एक टेक्निशियन रजेवर आहे. त्यामुळे एकावरच या रक्तपेढीचा सर्व भार पडत आहे. शिवाय रक्तदान शिबिरासाठी त्यांना गावागावात जावे लागते. पर्यायाने हा एकटा टेक्निशियन २४ तास यात रक्तपेढीमध्ये कार्यरत आहे. त्यात हा कर्मचारी महिला असल्यामुळे हा डोलारा सांभाळताना त्यांची अक्षरशः दमछाक होत आहे. कामाच्या या ताणतणावात त्याही रजेवर गेल्या तर ही रक्त पेढी बंद पडून सावंतवाडी तालुका परिसरातील जनतेला रक्तासाठी ओरोस येथे जावे लागणार आहे. त्यामुळे गरजेच्या वेळी रक्तपेढीमध्ये टेक्निशियन नसल्याने रक्तदाते असुनही याचा फटका रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना बसुन असुन रूग्णांच्या जीवावर बेतणार आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात सोमवारपर्यंत ब्लड बँकमधील रिक्त पदे न भरल्यास सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासमोर वैद्यकीय प्रशासनाच्या निषेधार्थ काळी फीत बांधून सावंतवाडी तालुक्यातील रक्तदात्यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.









