अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडू
प्रतिनिधी
बांदा
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त वैद्यकीय अधिकारी पद तात्काळ भरावे अन्यथा मनसेच्या वतीने मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेचे माजी बांदा विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांना निवेदन दिले आहे. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, मागील १ महीन्यापासून बांदा आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी पद रिक्त असल्यामुळे लोकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शालेय विद्यार्थी, नोकरदारवर्गाला वैद्यकीय कागदपत्रांसाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात जावे लागते, यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक तसेच आर्थिक ताण सहन करावा लागतो. मृतांच्या नातेवाईकांना वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे पोस्टमार्टमसाठी तासनतास दुसऱ्या रुग्णालयाच्या अधिकाऱ्याची वाट बघावी लागते.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रावर बांदा शहर, मडुरा, इन्सुली, शेर्ले, कास, नेतर्डे ही सात उपकेंद्र व चौदा गावे अवलंबून आहेत. वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे शासकिय कामांना अडथळा निर्माण झालेला आहे. गणेशचतुर्थी निमित्त चाकरमानी गावाकडे येणार आहेत, दरवर्षी प्रमाणे साथीचे रोग पसरण्याची भिती आहे.वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार आहे. रुग्णांना तातडीने योग्य सल्ला व उपचाराची गरज लक्षात घेता वैद्यकिय अधिकाऱ्याची नेमणूक तातडीने करावी. वरील समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर नेमणूक करावी, अन्यथा मनसेतर्फे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात शेवटी म्हटले आहे.
यावेळी यावेळी माजी विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत, माजी शहर अध्यक्ष बाळा बहिरे, जय पटेकर, विष्णू वसकर, जीवन हरमलकर, माजी विभाग अध्यक्ष नाना सावंत, चिन्मय नाडकर्णी, सुनील आसवेकर आदी उपस्थित होते.









