आचरा हिर्लेवाडी ग्रामस्थांची आचरा ग्रामपंचायतकडे मागणी
आचरा | प्रतिनिधी (फोटो परेश सावंत)
आचरा ते हिर्लेवाडी मुख्य रस्ता ते खोतवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणत खड्डे पडले असून रस्त्यावर गाडी चालवणे , पादचाऱ्यांना चालत जाणे धोक्याचे बनले असून वारंवार मागणी करूनही खड्डे बुजवले गेले नसल्याने हिर्लेवाडी ग्रामस्थांनी आचरा ग्रामपंचायत मध्ये दाखल होत ग्रामपंचायत मार्फत खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. यावेळी ग्रामस्थांनी अर्धवट राहिलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडीस यांनी येत्या 4 दिवसात ग्रामपंचायत मार्फत खड्डे बुजवले जातील असे ग्रामस्थांना आश्वस्त केले. हर्लेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग वायंगणकर, सचिव लऊ मालंडकर यांच्या नेतृत्वाखाली आचरा हिर्लेवाडी येथील ग्रामस्थ आचरा ग्रामपंचायतमध्ये दाखल झाले होते. यावेळी हिर्लेवाडी विभागाचे ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, सारिका तांडेल उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांनी विविध केलेल्या मागण्या, ठेकेदारांनी अपूर्ण ठेवलेली कामे याकडे लक्ष वेधले. हिर्लेवाडी मुख्य रस्ता ते खोतवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे चालणेही धोकादायक बनले आहे. जलजीवन नळपाणी योजना अपूर्ण अवस्थेत आहे. मारलेले चर यामुळे रस्त्याची साईडपट्टी धोकादायक बनली असून वाहने त्यात अडकून पडत आहेत, गणपती साना अपूर्ण अवस्थेत आहे, स्ट्रीट लाईटचाही प्रश्न सातत्याने उद्भवत असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी सरपंच जेरोन फर्नांडीस यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे लवकरच भरून घेतले जातील. जी कामे अपूर्ण आहेत ती संबंधित ठेकेदाराला समज देऊन पूर्ण करून घेतली जातील असे आश्वासन दिले.









