उद्योजकांची मागणी, वाहने अडकून वेळ अन् पैसा वाया
बेळगाव : उद्यमबाग येथे अनेक ठिकाणी सीडी वर्कला लागूनच खड्डे पडले आहेत. यामुळे उद्यमबाग येथील कारखान्यांमध्ये येणारी अवजड वाहने या खड्ड्यांमध्ये अडकत आहेत. अनेक वेळा तक्रारी करून देखील या समस्येकडे लक्ष दिले जात नसल्याची तक्रार उद्योजकांतून केली जात आहे. यामुळे वाहनांचे अपघात होत असून उद्योजकांचे आर्थिक नुकसान होत आहे. उद्यमबाग परिसरात मागील काही वर्षात गटारी तसेच काँक्रीटचे रस्ते करण्यात आले. रस्ते करताना सीडी वर्क करण्यात आले. परंतु, सीडी वर्कपासून रस्त्यापर्यंत योग्यप्रकारे रस्ता करण्यात आला नसल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. कारखान्यांमधील मालाची वाहतूक करणारे ट्रक या खड्ड्यांमध्ये अडकत आहेत. लोखंड तसेच इतर कच्चा माल मोठ्या वाहनांमधून कारखान्यांपर्यंत आणला जातो. परंतु, सीडी वर्कजवळच्या खड्ड्यांमध्ये हे अवजड ट्रक अडकत असल्याने त्याचा आर्थिक फटका उद्योsजकांना सहन करावा लागत आहे.
सीडी वर्कजवळच्या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करा
बऱ्याच वेळा ट्रक अडकल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने ते हटवावे लागत आहेत. यामध्ये वेळ व पैसा वाया जात असल्याने सीडी वर्कजवळच्या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी व रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करून द्यावा, अशी मागणी उद्योजकांतर्फे करण्यात येत आहे.









