अन्यथा आत्मदहन करण्याचा युवा रक्तदाता संघटनेचा इशारा
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीतील रिक्त तंत्रज्ञ (टेक्निशियन) पदे भरण्याबाबत जिल्हा आरोग्य प्रशासनाने सहा महिन्यात कोणतीही कार्यवाही केली नाही. त्याच्या निषेधार्थ युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी सोमवारी रक्तदात्यांसह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासमोर दंडावर काळी फीत बांधून आणि हातात निषेध फलक घेऊन तीव्र आंदोलन छेडले. तसेच या आठवड्यात किमान एक तरी तंत्रज्ञ रुजू न झाल्यास जिल्हा रुग्णालयासमोर सावंतवाडी तालुक्यातील रक्तदात्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये केवळ दोनच टेक्निशियन असल्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. युवा रक्तदाता संघटनेने ही रिक्त पदे भरण्याबाबत गेले सहा महिने जिल्हा आरोग्य प्रशासनाचे अनेक वेळा लक्ष वेधले. परंतु ही रिक्त पदे न भरल्याने चार दिवसांचा अवधी देऊन ही रिक्त पदे न भरल्यास सोमवारी आंदोलन छेडण्याचा इशारा देव्या सुर्याजी यांनी दिला होता. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने युवा रक्तदाता संघटनेचे रक्तदात्यांसह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासमोर दंडावर काळी फीत बांधून आणि हातात निषेध फलक घेऊन तीव्र आंदोलन छेडले.यावेळी गौतम माठेकर, अर्चित पोकळे, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, संदीप निवळे, राजू धारपवार, सुरज मठकर, प्रतिक बांदेकर, वसंत सावंत, प्रथमेश प्रभु, दीपक धुरी, देवेश पडते, साईश निर्गुण आदी उपस्थित होते.









