पुणे / वार्ताहर :
हनी ट्रपमध्ये अडकून देशाची संरक्षण विषयक गोपनीय माहिती शत्रूराष्ट्राला पुरवल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक केलेली आहे. त्यांच्या विरोधात नुकतेच दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, कुरुलकरवर देशद्रोहाच्या गुह्याचे कलम न लावण्यात आल्याने काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी पुण्यातील एटीएस कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी माजी आमदार मोहन जोशी म्हणाले, डीआरडीएचे संचालक कुरुलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. डीआरडीओचे खाते पंतप्रधान मोदींच्या आखत्यारित असताना या खात्यातील गोपनीय संरक्षण विषयक माहिती पाकिस्तानला पुरवल्याने कुरुलकर याच्यावर देशद्रोहाचे कलम लावले गेले पाहिजे. मात्र, दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असले तरीदेखील संबंधित कलम जाणीवपूर्वक लावले गेले नाही. कुरुलकर याने देशाच्या संरक्षणाशी तोडजोड, बेईमानी केलेली आहे. देशाशी गद्दारी करणाऱया आणि शत्रूशी सौदा करणाऱया कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणतेही उत्तर न देता कुरुलकरला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत डीआरडीओ असतानाही महत्वपूर्ण पदावरील व्यक्ती गोपनीय माहिती शत्रुराष्ट्राला पुरवत असेल तर ही बाब चिंताजनक आहे. देश प्रेमाच्या गप्पा वारंवार मारणारे अशावेळी नेमके कुठे गेले? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. आरोपीवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला कडक शासन करावे. अन्यथा यापुढील काळात मोठे आंदोलन आम्हाला उभारावे लागेल.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, महिला शहराध्यक्ष पूजा आनंद ,दत्ता बहिरट, माजी नगरसेवक अविनाश बागवे, रमेश अय्यर, अभिजीत म्हस्के आदी उपस्थित होते.








