मनपाच्या लेखा स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले : विविध खर्चांना मंजुरी, चार दिवस आधीच खर्चाच्या फाईल द्याव्या
प्रतिनिधी/ बेळगाव
जुन्या खर्चाची फाईल सादर केल्यानंतरच त्याला बैठकीत मंजुरी दिली जाईल, अन्यथा मंजुरी मिळणार नाही. यापुढे बैठकीच्या चार दिवस आधीच खर्चाची फाईल देण्यात यावी. लेखा स्थायी समितीला काय महत्त्व आहे, ते पहिल्यांदा स्पष्ट झाले पाहिजे. केलेल्या खर्चाला केवळ मंजुरी देण्यासाठी बैठक घेतली जाते. या कारणावरून मंगळवार दि. 23 रोजीच्या लेखा स्थायी समिती बैठकीत अध्यक्ष व सदस्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली.
मंगळवारी महानगरपालिकेच्या लेखा स्थायी समितीची बैठक स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी रेश्मा बसवराज कामकर होत्या. सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरी गीता कौलगी यांनी विविध विभागाकडून करण्यात आलेल्या खर्चाचे वाचन करत त्याला मंजुरी देण्याची विनंती केली. मात्र या खर्चाला मंजुरी कोणत्या आधारावर द्यावी. पहिल्यांदा आपल्याकडे खर्चाची फाईल देणे जरुरीचे आहे. त्याची शहानिशा करूनच मंजुरी दिली जाईल, असे अध्यक्ष व सदस्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. त्यावर मुख्य फाईल महापालिका आयुक्तांकडे असते. त्यांच्या परवानगीनंतर फाईल मिळू शकते. आपल्याकडे केवळ व्हाऊचर असलेल्या फाईल्स उपलब्ध आहेत. हव्या तर त्या सादर केल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. लेखा स्थायी समितीला नेमके काय महत्त्व आहे ते आधी स्पष्ट झाले पाहिजे. सर्व कामकाज अधिकारीच करत असतील तर आम्ही कशाला पाहिजे? खर्चाची फाईल दाखविल्यानंतरच त्या मंजूर केल्या जातील. अन्यथा कोणत्या आधारावर मंजूर करणार, असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. तसेच पुढच्या बैठकीवेळी चार दिवस आधी खर्चाच्या फाईल दिल्या जाव्यात. त्यानंतर बैठक बोलवावी, अशी सूचना अध्यक्ष, व सदस्यांनी केली.
बैठकीत जाहिरात प्रचारासाठी महापालिकेकडून 6 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर सामान्य खर्च म्हणून 8 लाख रुपये खर्ची घालण्यात आले आहेत, असे सांगण्यात आले.
मशीनचा प्रश्न चांगलाच गाजला
यावेळी सकिंग मशीनचा प्रश्न चांगलाच गाजला. महापालिकेच्या दोन सकिंग मशीन असून त्यांचा मनमानी पद्धतीने वापर सुरू असल्याचा आरोप सदस्य शंकर पाटील यांनी केला. शहरात मशीनसाठी 1800 रुपये तर शहराबाहेर गेल्यास 2500 रुपये आकारले जातात. मशीन हवी असल्यास आधी चलन भरणे गरजेचे आहे. मात्र काही जण महापालिकेला चलन भरण्याआधीच मशीन घेऊन जात आहेत. महापालिकेच्या कोणकोणत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेफ्टिक टँक आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे. कचरा उचल करणाऱ्या वाहनात इंधन भरताना घोटाळा केला जात आहे. चालू महिन्यात 508 कि. मी. सकिंग मशीन फिरल्या असून इंधनापोटी 10 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर त्या मोबदल्यात महापालिकेला मिळणारे उत्पन्न अत्यंत तुटपुंजे आहे. त्यामुळे महापालिकेला नफा होण्याऐवजी तोटाच अधिक होत आहे. त्यामुळे या मशीन सुरू ठेवण्याऐवजी बंद केलेल्या बऱ्या असा सूर बैठकीत उमटला.
सुरुवातीला अधिकारी गैरहजर राहिल्याबद्दल सर्वांना नोटीस देण्यात आली आहे का? या बाबत सदस्यांनी कौन्सिल सेक्रेटरी गीता कौलगी यांना विचारणा केली. सर्वांना नोटीस दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीला लेखा स्थायी समितीचे सदस्य मंगेश पवार, रेश्माबैरकदार, शंकर पाटील उपस्थित होते. तर अन्य तिघे सदस्य अनुपस्थित राहिले.
मनपाकडूनच पथदीपांची देखभाल
महापालिकेकडून पथदीपांच्या दुरुस्तीसाठी दोन कंपन्यांना ठेका देण्यात आला होता. मात्र तो ठेका रद्द करण्यात आला असून महापालिकेकडूनच आता पथदीपांची देखभाल केली जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.









