जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन : जिल्हास्तरीय जागृती समितीच्या बैठकीत सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
अनुसूचित जाती-जमातीवरील अन्यायाच्या तक्रारी दाखल झाल्यास त्यावर त्वरित विचार करून आवश्यक ते उपक्रम हाती घ्यावेत. विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला.
जि. पं. सभागृहात शनिवारी झालेल्या अनुसूचित जाती-जमाती (अन्याय नियंत्रण) जिल्हास्तरीय जागृती समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमाती समुदायाचे नेतेमंडळी व जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यांनी वेळोवेळी बैठक घेऊन तक्रारी जाणून घेतल्यास त्या दूर करणे शक्य होईल. शहरातील आरपीडी चौकात वीर मदकरी यांच्या पुतळ्याची स्थापना करण्याची मागणी विविध संघटनांकडून अनेक दिवसांपासून आहे. हा विषय महापालिकेच्या बैठकीत मांडून मंजुरी मिळावावी. अनुसूचित जाती-जमातीला सरकारकडून वितरण करण्यात येणारे कर्ज थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावे. सफाई कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य त्वरित उपलब्ध करून द्यावेत. वैद्यकीय चिकित्सेसाठी जिल्हा रुग्णालयाकडे जाणाऱ्या अनुसूचित जाती-जमातीतील रुग्णांना त्वरित सेवा देण्यात यावी. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय पथकाने जनतेशी सौजन्याने वागावे. न्यायालयात प्रलंबित असलेली अन्यायाची प्रकरणे वेळीच निकालात काढावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले, जिल्ह्यामध्ये अमली पदार्थ विक्री-वाहतूक, चेनस्नॅचिंग यासारखी प्रकरणे वाढीस लागली असून याला पायबंद घालण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय जागृती समितीचे सदस्य करेप्पा गु•sन्नवर म्हणाले, काही गावांमध्ये सार्वजनिक स्मशानभूमीत अनुसूचित जाती-जमातीला अंत्यक्रिया करण्यासाठी समस्या उद्भवत आहेत. सदस्य मल्लेश चौगुले म्हणाले, पावसाळ्याला सुरुवात झाली असून सफाई कामगारांना आवश्यक असणाऱ्या सुरक्षा साहित्याचा पुरवठा तसेच जिल्हा रुग्णालयामध्ये मध्यरात्री दाखल होणाऱ्या अनुसूचित जाती-जमातीतील रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यात विलंब होत आहे. विजय तळवार यांनीही विचार व्यक्त केले.
बैठकीमध्ये बालविवाह नियंत्रण, चोरी-दरोडे, अमली पदार्थांची विक्रीवर नियंत्रण आदी विषयांवरही चर्चा झाली. जि. पं. सीईओ राहुल शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रृती, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अभिनव जैन, समाज कल्याण खात्याचे सहसंचालक रामणगौडा कन्नोळ्ळी, आरोग्य-कुटुंब कल्याण अधिकारी ईश्वर गडाद, सिद्धराय मेत्री, बसप्पा तळवार, जीवन मांजरेकर आदी उपस्थित होते.









