संशयितांमध्ये चार जाणांचा समावेश
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील जमीन घोटळाप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटीने) आणखी एक तक्रार नोंद केली आहे. शिवोलीतील एका जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून ती जमीन आपल्या नावे केल्याप्रकरणी चारजणांविरोधात भादंसंच्या 465, 466,467, 468, 471, 419 तसेच 420 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांची नावे ब्रांका डिनीझ, पावलीना जुलीना डिनीझ उर्फ पालमरीना गोन्साल्वीस, मारियाना गोन्साल्वीस व रॉयसन रॉड्रिग्स अशी असून चारहीजण शिवोली येथील आहेत. याबाबत झेवियर रुझारियो परेरा मूळ शिवोली येथील असून सध्या मुबंईत राहत आहे, यांनी तक्रार दाखल केली आहे.
चारही संशयितांनी शिवोली येथील सर्वे क्रमांक 493/2 या जमिनीचे 1951 सालातील बनावट सेलडीड तयार केले. त्याच्या आधारे 6 ऑगस्ट 2021 रोजी उत्तराधिकार मिळविले. नंतर दोन्ही बनावट कागदपत्रे बार्देश तालुका मामलेदारकडे सादर करून म्युटेशन तयार केले. अशा प्रकारे संशय़ितांनी बनावट कागदपत्रे तयार करून जमीन बळकाविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
एसआयटीने राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणात आतापर्यंत दोन तक्रारी नोंद केल्या आहेत. त्यातील पहिल्या तक्रारीत एकूण पाच संशयितांना अटक केली होती. त्यापैकी दोन संशयित पुरातत्व आणि पुराभिलेख खात्यातील कर्मचारी आहेत. विक्रांत शेट्टी, मोहम्मद सुहेल सुफी, धिरेश नाईक व शिवानंद मडकईकर या चारही संशयितांची सशर्थ जामिनावर सुटका झाली आहे तर अल्ताफ याने जमिनसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली आहे. दुसऱया तक्रारीत चार संशय़ितांची नावे पोलिसांसमोर आली आहेत मात्र यापैकी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. एसआयटीचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.








