पुणे / प्रतिनिधी :
पुलवामा घटना आणि अदानी गैरव्यवहारप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका मांडावी. अन्यथा, रस्त्यावर उतरून राज्यभर आणखी आक्रमकपणे आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी येथे दिला. ‘महाराष्ट्रभूषण पुरस्कार’ सोहळय़ात उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटनेत सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
काँग्रेसच्या वतीने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पुकारण्यात आलेल्या ‘जवाब दो’ आंदोलनात ते बोलत होते. पटोले म्हणाले, पुलवामाच्या घटनेमध्ये केंद्र सरकारने आवश्यक ती पाऊले उचलली नसल्याची माहिती आता समोर आली आहे. आम्ही याबाबत जे आरोप करत होतो, त्याला माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या आरोपाने पुष्टी मिळाली आहे. म्हणूनच पंतप्रधानांनी आता यावरील मौन सोडावे. पुलवामा घटना आणि अदानी गैरव्यवहारप्रकरणी मोदी यांनी भूमिका मांडावी. अन्यथा, आगामी काळात आम्ही राज्यभरात रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करू.
आवश्यक उपाययोजना का केल्या नाहीत?
‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’वेळी उष्माघाताचा प्रकार घडल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाला. त्यांना ‘भारत भूषण पुरस्कार’ मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मात्र, त्यांच्या पुरस्कार सोहळय़ासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासाठी वातानुकूलित पंडोल तयार करण्यात आला. तर जनतेला उन्हात बसवण्यात आले. मोठय़ा संख्येने लोक येणार, हे सरकारला माहीत असतानाही आवश्यक उपाययोजना का केल्या नाहीत, हा प्रश्न आहे. मात्र, सरकार आंधळे, बहिरे झाल्यासारखी स्थिती आहे. म्हणूनच आता सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी अपेक्षा पटोले यांनी व्यक्त केली.








