शिवप्रेमींची मागणी : करणी सेना, गोंयची नारी शक्ती’ची पोलिसांत तक्रार
म्हापसा : कळंगुटमधील छत्रपती शिवपुतळ्यावरून सुरू असलेला वाद हळूहळू शमला असून यासंदर्भात आता शिवप्रेमी व काही हिंदू संघटनांनी सरपंच जोसेफ सिक्वेरा व संबंधित पंचसदस्य ज्यांनी पुतळा हटविण्यासंबंधी ठराव घेतला होता त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जोसेफ सिक्वेरा यांच्यासह अॅनी फर्नांडिस, सावियो गोन्साल्विस यांनी हेतुपुरस्सर धार्मिक भावना दुखावण्यासह शिवप्रेमींना चिथावल्याप्रकरणी या संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या शिवप्रेमींनी केली आहे. करणी सेनेचे सरचिटणीस संतोषसिंग राजपूत व गोंयची नारी शक्ती या एनजीओच्या संस्थापक सदस्या निशा वेर्णेकर यांनी कळंगूट पोलीस स्थानकात स्वतंत्र तक्रार देत सरपंचांसह ठराव घेतलेल्या पंचसदस्यांवर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी पंचायत इमारत हायजॅक केली व पंचायतीत कामाला येणाऱ्यांना सेवेपासून वंचित ठेवले, असा दावा संतोषसिंग राजपूत यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. तर निशा वेर्णेकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, शिवपुतळा हटविण्यासंदर्भात पंचायतीने काढलेल्या आदेशाचा जाब विचारण्यास शिवप्रेमी मोठ्या संख्येने पंचायत कार्यालयाजवळ गेले होते. परंतु, सरपंचांनी आपल्या गुंडाना बोलावून शिवप्रेमींना शिवीगाळ करून भडकावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मंगळवारी पंचायत कार्यालयावर जवळपास 800 पैक्षा अधिक जणांनी चाल करून पंचायत मालमत्तेची नासधूस केल्याची तक्रार यापूर्वीच सरपंच सिक्वेरा यांनी कळंगूट पोलिसांत दिली आहे.
‘पुतळा हटाव’चा ठरावच बेकायदा
करणी सेनेचे संतोषसिंग राजपूत यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ज्या बेटावर पती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला ती जागा मुळात पंचायतीच्या मालकीची नाही. तरीही पंचायतीकडून परस्पर सदर पुतळा बेकायदेशीर ठराव घेण्यात आला आणि नंतर आदेश जारी केला, त्यामुळेच शिवप्रेमी सरपंचांना याविषयी जाब विचारण्यास गेले, त्यावेळी सरपंचांनी बोलाविलेल्या गुडांनी शिवप्रेमींवर हल्ला करून जातीय दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप या तक्रारीत केला आहे.
महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकलेल्या अल्पवयीनाला समज
दरम्यान कळंगूट येथील शिवपुतळ्याचा वाद सुरू असतानाच हडफडे येथील एका अल्पवयीन मुलाने महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकली. हणजूण पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ त्या अल्पवयीन मुलाला गाठले. त्याच्याकडून माफीनामा लिहून घेतला आणि सांमजस्याने प्रकरण मिटविले. हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रशल देसाई यांनी याबाबतीत दाखविलेल्या कर्तव्य तत्परतेबद्दल शिवोली येथील स्वामी समर्थ मठाचे संस्थापक नीलेश वेर्णेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.









