दक्षिणमध्ये 8, उत्तरेत 15 तर ग्रामीण मतदारसंघात 12 उमेदवार रिंगणात : जिल्ह्यातील 18 मतदारसंघांतून 47 जणांची माघार
बेळगाव : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज माघारी कोण घेणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले होते. दक्षिण मतदारसंघामधून दोन, उत्तर मतदारसंघामधून दोन तर ग्रामीण मतदारसंघामधून तीन उमेदवार अशा एकूण सात जणांनी माघार घेतली. त्यामुळे दक्षिणमध्ये 8 उमेदवार, उत्तरमध्ये 15 उमेदवार आणि ग्रामीण मतदारसंघात 12 उमेदवार रिंगणामध्ये राहिल्याने निवडणुकीला रंगत येणार आहे. मात्र या तिन्ही मतदारसंघात खरी लढत ही तिरंगीच होणार आहे.
दक्षिण मतदारसंघात आठ उमेदवार रिंगणात
अटीतटीची लढत असलेल्या दक्षिण मतदारसंघात दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे चार राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारासह चार अपक्ष उमेदवार निवडणूक लढविणार हे निश्चित झाले आहे. यामध्ये भाजपचे उमेदवार अभय पाटील, म. ए. समितीचे रमाकांत कोंडूस्कर, आपचे नुरअहमद मुल्ला, काँग्र्रेसच्या प्रभावती मास्तमर्डी, जनता दल श्रीनिवास ताळुकर, कर्नाटक राष्ट्रीय समिती हणमंत माडीवाळर, भारत गोटी, संजय नाईक असे आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. छाननीनंतर दक्षिण मतदारसंघात एकूण 10 उमेदवारी अर्ज होते. पण यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे 8 उमेदवार रिंगणात आहेत.
उत्तरमध्ये 15 उमेदवार रिंगणात
उत्तर मतदारसंघातदेखील उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. 19 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र छाननीवेळी दोन उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. तर माघारीवेळी अजिम पटवेगार आणि नासिरअहमद हट्टीहोळी यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतली आहे. त्यामुळे उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्यावतीने असिफ ऊर्फ राजू सेठ, भाजपच्यावतीने डॉ. रवी पाटील, आम आदमी राजकुमार टोपण्णावर, निधर्मी जनता दल शिवानंद मुगळीहाळ, रिपब्लिकन पार्टी दिलशाद ताशिलदार, कल्याण राज्य प्रगती पक्ष प्रवीण हिरेमठ, कर्नाटक राष्ट्र समिती पक्ष बसवराज जरळी, उत्तम प्रजाकीय पक्ष मल्लाप्पा चौगुला, म. ए. समितीच्यावतीने अॅड. अमर येळ्ळूरकर आणि अपक्ष म्हणून अशोक गोवेकर, काशीराम चव्हाण, नागेश विवते, मगदूम इस्माईल मगदूम, विशाल गायकवाड, श्रीनिवास तळवार असे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
ग्रामीण मतदारसंघात 12 उमेदवार
ग्रामीण मतदारसंघात एकूण 15 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. म. ए. समितीच्यावतीने आर. एम. चौगुले, काँग्रेस लक्ष्मी हेब्बाळकर, भाजप नागेश मनोळकर, आम आदमी टी. मालती, बहुजन समाज पार्टीचे यमनाप्पा गंगाप्पा तळवार, जनता दल शंकरगौडा रुद्राप्पा पाटील, रिपब्लिकन पार्टी गणेशकुमार सिंगन्नावर, कर्नाटक राष्ट्रीय समिती पार्टी शकुंतला अशोक यलिगार तर अपक्ष बसवराज कु•sमनी, मल्लाप्पा काद्रोळी, रविकुमार, रुपेश कडू, संजीव प्रणेश गणाचारी असे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक बहुरंगी होणार आहे. मात्र, यामध्ये बलाढ्या उमेदवारांमध्ये मते खेचण्यासाठी चढाओढ दिसून येते. मतदार कुणाला कौल देणार, हे मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे.
18 मतदारसंघातून 288 जण रिंगणात
विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा सोमवारी अंतिम दिवस होता. त्या दिवशी दुपारी 18 विधानसभा मतदारसंघातून 47 जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता एकूण 288 जण रिंगणात आहेत. बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदारसंघातून 360 अर्ज दाखल झाले होते. त्यामधील 25 अर्ज अवैध ठरले होते. 335 जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यामध्ये आता 47 जणांनी माघार घेतल्यामुळे 288 जण रिंगणात आहेत. जिल्ह्यामधील 18 मतदारसंघात 306 जणांनी अर्ज दाखल केले असून एकूण 360 अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवार दि. 21 रोजी अर्जांची छाननी झाली. त्यामध्ये 25 जणांचे अर्ज अवैध ठरले होते. सोमवार दि. 24 रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामध्ये 47 जणांनी माघार घेतली आहे. सर्वच मतदारसंघात आता बहुरंगी लढती होणार आहेत.









