विधानसभा निवडणुकीबाबत भाजपाध्यक्ष नड्डा यांचा नेत्यांना सल्ला
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी भाजपची एक मोठी बैठक झाली. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व 14 जिल्हे आणि 70 विधानसभा मतदारसंघांमधील महत्त्वाच्या नेत्यांशी निवडणुकांबाबत चर्चा केली. यामध्ये पक्षाच्या रणनीतीवरही चर्चा झाली. या बैठकीत राष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस बी. एल. संतोष आणि राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल हे देखील उपस्थित होते. जे. पी. नड्डा यांनी दिल्ली भाजप नेत्यांना स्पष्ट संदेश देत आपल्याला दिल्लीतील निवडणुका जिंकण्याची पूर्ण संधी असल्याने एकजुटीने लढण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तिकीट इच्छुकांनाही संदेश दिला. ज्यांना तिकीट मिळत नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नये. कारण ही लढाई 26 वर्षांनंतर पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी आहे. जर तुम्हाला तिकीट मिळाले नाही तर कोणत्याही पक्षाकडून किंवा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची चूक करू नका. नवीन मतदार जोडण्यासाठी तुमची सर्व शक्ती पणाला लावा. पक्षामध्ये शक्य तितके नवीन लोक जोडा, असेही नड्डा यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
भाजपचे संकल्पपत्र दोन-तीन दिवसात
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा यांनी देशाला अनेक कल्याणकारी योजना दिल्या आहेत. आमचा जाहीरनामाही दोन-तीन दिवसांत प्रसिद्ध होईल. खोटी आश्वासने देऊन आणि दिशाभूल करून केजरीवाल यांनी ज्या जनतेला फसवले, त्यांना आम्ही सर्व सुविधा पुरवणार आहोत. भाजपच्या संकल्पपत्रात जनहितार्थ आणि विकासात्मक स्वरुपाचे अनेक निर्णय घेतले जातील, असे भाजप खासदार मनोज तिवारी यांनी सांगितले.









