संकेश्वर पोलिसांची राजस्थानात कारवाई
बेळगाव : हाणामारी प्रकरणानंतर तब्बल 32 वर्षे फरारी असलेल्या राजस्थानमधील तिघा जणांना संकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी ही माहिती दिली आहे. 1993 मध्ये आईस्क्रीम विक्रेत्यांमध्ये मारामारीची घटना घडली होती. आईस्क्रीमच्या दरावरून ही घटना घडली होती. एकाने दुसऱ्या आईस्क्रीम विक्रेत्याचे कान चावले होते. यावेळी एफआयआर दाखल झाल्यानंतर संशयितांना अटक झाली होती. जामिनावर मुक्तता झाल्यानंतर ते न्यायालयीन कामकाजाला हजर राहिले नव्हते. नारायणलाल हिरालाल गुज्जर (वय 50) राहणार गाव रोजिमंगरी खेड, जि. बिल्वर, राजस्थान, सुखलाल चौगालाल गुज्जर (वय 50) राहणार गाव करणगड, जि. बिल्वर, लकाराम चौगालाल गुज्जर (वय 52) राहणार गाव करणगड, जि. बिल्वर अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणातील चौघा जणांपैकी तिघा जणांना एलपीआर वॉरंटवरून संकेश्वरचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सी. जे. सारापुरे व हवालदार एस. आर. बेविनकट्टी यांनी राजस्थानमध्ये अटक करून न्यायालयासमोर हजर केले आहे.









