मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे ‘अष्टक’, राहुलचे दुसरे नाबाद शतक
वृत्तसंस्था/ मुंबई
कर्णधार केएल राहुलने नोंदवलेले मोसमातील व मुंबईविरुद्धचे दुसरे नाबाद शतक आणि कृणाल पंडय़ासह इतर गोलंदाजांनी केलेला भेदक मारा यांच्या बळावर लखनौ सुपर जायंट्सने आयपीएलमधील सामन्यात मुंबई इंडियन्सवर 36 धावांनी विजय मिळविला. या मोसमातील त्यांचा हा पाचवा विजय असून ते आता चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. मुंबईचा हा सलग आठवा पराभव असून त्यांनी तळाचे स्थान कायम राखले आहे.
प्रारंभी केएल राहुलने शतक झळकवले तरी लखनौ सुपर जायंट्सला निर्धारित 20 षटकांत 6 बाद 168 धावांपर्यंत मजल मारता आली. राहुलने 62 चेंडूत नाबाद 103 धावा फटकावल्या. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या सर्वाधिक सहा शतकांच्या भारतीय विक्रमाशी बरोबरी केली. मात्र मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना या सामन्यातही सूर गवसला नाही. लखनौने भेदक मारा करीत त्यांना 20 षटकांत 8 बाद 132 धावांवर रोखत 36 धावांनी शानदार विजय नोंदवला. मुंबईतर्फे कर्णधार रोहित शर्माने 31 चेंडूत 39, तिलक वर्माने 27 चेंडूत 38 व पोलार्डने 20 चेंडूत 19 धावा जमविल्या. अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. कृणाल पंडय़ाने रोहित शर्मा, पोलार्ड व सॅम्स यांचे बळी मिळविले. मोहसिन खान, होल्डर, रवी बिश्नोई, आयुष बदोनी यांनी एकेक बळी मिळविला.
16 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यातही मुंबई इंडियन्सविरुद्ध राहुलने नाबाद शतक (103) नोंदवले होते. त्याने येथील आपल्या नाबाद खेळीत 12 चौकार व चार षटकार मारले. मात्र त्याला इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. मनीष पांडेकडून त्याला थोडीफार साथ मिळाली. पण त्यालाही मोठे योगदान देता आले नाही. त्याने 22 चेंडूत 22 धावा जमविल्या. मार्कस स्टोईनिस (0), कृणाल पंडय़ा (1), दीपक हुडा (10) झटपट बाद झाले. नंतर राहुलने युवा आयुष बदोनीसमवेत 25 चेंडूत 47 धावांची भर घातली. बदानीने 11 चेंडूत 14 धावा काढल्या. त्यांच्या या भागीदारीमुळे लखनौला दीडशेचा टप्पा पार करता आला. मुंबईतर्फे मेरेडिथ व पोलार्ड यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले तर सॅम्स व बुमराह यांनी एकेक बळी टिपला. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात सॅम्सने 4 बळी मिळविले होते. पण या सामन्यात त्याला एका बळीसाठी 40 धावा मोजाव्या लागल्या. पोलार्डने दोन षटकात 2 बळी मिळविले. मेरेडिथने दोन बळी मिळविले असले तरी त्यालाही 40 धावा द्याव्या लागल्या. बुमराहने मात्र किफायतशीर मारा केला.
मुंबईचे वर्चस्व, तरीही राहुलचे शतक
प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी प्रारंभापासून वर्चस्व गाजविण्यास सुरुवात केली. डी कॉकला (10) बाद करून बुमराहने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. शॉर्ट कव्हरवर रोहित शर्माने त्याचा लो कॅच पकडला. पॉवरप्लेमध्ये मुंबईने चार गोलंदाजांचा वापर केला. त्यात लखनौला फक्त 1 बाद 32 धावा जमविता आल्या. दोन्ही बाजूंनी मुंबईने दडपण ठेवल्याने राहुल व पांडे यांना या षटकांत धावांचा वेग वाढवण्यासाठी झगडावे लागत होते. उनादकटला षटकार ठोकून राहुलने ही कोंडी फोडली. नंतर पांडेने त्याचा कित्ता गिरवत मेरेडिथला साईटस्क्रीनकडे षटकार खेचल्यानंतर पुढच्या चेंडूवर पॉईंटच्या दिशेने चौकार लगावला. या षटकात 17 धावा घेत 10 व्या षटकाअखेर लखनौने 1 बाद 72 अशी मजल मारली होती.
बुमराहला परत गोलदांजीस आणल्यावर राहुलने चौकारानंतर एकेरी धाव घेत अर्धशतक पूर्ण केले. पांडे मात्र पोलार्डच्या उसळत्या चेंडूवर मेरेडिथकरवी झेलबाद झाला. राहुलने सॅम्सला षटकार ठोकल्यानंतर तो गोंधळला आणि त्याने सलग तीन चेंडू वाईड टाकले. याच षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने स्टोईनिसचा बळी मिळविला. तिलक वर्माने डीप मिडविकेटवर त्याचा झेल टिपला. आयुष बदोनीने राहुलसमवेत झटपट धावा जमवित संघाला 160 हून अधिक धावांचा टप्पा गाठून दिला. राहुलने बुमराहला दोन चौकार मारल्यानंतर उनादकटला पुढच्या षटकात सलग तीन चौकार मारत शतकासमीप झेप घेतली. मेरेडिथला षटकार ठोकत त्याने थाटात आपले शतक पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक ः लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 6 बाद 168 ः डी कॉक 10 (9 चेंडूत 1 षटकार), राहुल नाबाद 103 (62 चेंडूत 12 चौकार, 4 षटकार), मनीष पांडे 22 (22 चेंडूत 1 षटकार), स्टोईनिस 0 (3 चेंडू), कृणाल पंडय़ा 1 (2 चेंडू), दीपक हुडा 10 (9 चेंडूत 1 चौकार), आयुष बदोनी 14 (11 चेंडूत 1 षटकार), होल्डर नाबाद 0, अवांतर 8. गोलंदाजी ः पोलार्ड 2-8, मेरेडिथ 2-40, बुमराह 1-31, सॅम्स 1-40, शोकी 0-11, उनादकट 0-36.
मुंबई इंडियन्स 20 षटकांत 8 बाद 132 ः इशान किशन 8 (20 चेंडू), रोहित शर्मा 39 (31 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), ब्रेव्हिस 3 (5 चेंडू), सूर्यकुमार यादव 7 (7 चेंडूत 1 चौकार), तिलक वर्मा 38 (27 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), पोलार्ड 19 (20 चेंडूत 1 षटकार), सॅम्स 3, उनादकट 1, शोकीन नाबाद 0, बुमराह नाबाद 0, अवांतर 14. गोलंदाजी ः कृणाल पंडय़ा 3-19, मोहसिन खान 1-27, होल्डर 1-36, बिश्नोई 1-28, बदोनी 1-6 (1 षटक).









