हमासने 3 इस्रायली बंधकांना सोडले : इस्रायल 183 पॅलेस्टिनी कैद्यांनाही सोडणार
वृत्तसंस्था/ तेल अवीव
पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने शनिवारी युद्धबंदी करारांतर्गत तीन इस्रायली ओलिसांची सुटका केली. ओलिसांची नावे एली शराबी (52), ओहद बेन अमी (56) आणि ओर लेवी (34) अशी आहेत. या तिन्ही ओलिसांना रेडक्रॉस संघटनेकडे सोपवण्यात आले. रेडक्रॉस त्यांना गाझामधून इस्रायलला हलवेल. सुटकेनंतर तिन्ही ओलिसांचे फोटो प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये ते खूप बारीक आणि आजारी दिसत आहेत. आता इस्रायल 183 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडणार आहे. 19 जानेवारी रोजी कतारमध्ये झालेल्या युद्धबंदी करारांतर्गत ओलिसांची ही पाचवी देवाणघेवाण आहे. करार लागू झाल्यापासून एकूण 16 इस्रायली आणि पाच थाई बंधकांना सोडण्यात आले आहे.
7 ऑक्टोबर 2023 रोजी हजारो हमास सैनिकांनी इस्रायलवर हल्ला करत 1200 लोकांना ओलीस ठेवले. यानंतर काही तासांतच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केल्यापासून तणावाची स्थिती कायम आहे.









