वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या ऑक्टोबर महिन्यात भारतात फिफाची 17 वर्षाखालील वयोगटाची महिलांची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा होणार आहे. दरम्यान, तिसऱया पार्टीकडून हस्तक्षेप झाल्याने भारताने या स्पर्धेचे यजमानपद हक्क सोडावेत,अन्यथा अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवर बंदी घालण्याची धमकी फिफाकडून मिळाली असल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय फुटबॉल फेडरेशनची निवडणूक न घेण्याचा आदेश देण्यात आला होता. या आदेशानंतर भारतीय फुटबॉल फेडरेशन विरोधात हालचाली सुरू झाल्या आणि या आगामी स्पर्धेचे यजमानपद भारताने सोडावे नाहीतर या फेडरेशनवर बंदी घातली जाईल, असे फिफाच्या नियंत्रण समितीने धमकीवजा इशारा दिला आहे. प्रशासकीय समितीच्या निर्धारित आदेशानुसार अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनकडून निवडणूक घेतली जाऊ नये, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने गेल्या बुधवारी दिले होते. त्यानंतर अखिल भारतीय फुटबॉल संघटनेमध्ये निवडणूक घेण्यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्याचे दिसून आल्याने फिफाने अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला बंदी घालण्याची धमकी दिली आहे.
फिफाची 17 वर्षाखालील वयोगटाची महिलांची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा 11 ऑक्टोबरपासून भारतात होणार आहे. दरम्यान, भारताने या स्पर्धेचे यजमानपद सोडावे, यासाठी दडपण आणले जात आहे. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनची निवडणूक 28 ऑगस्टला निश्चित केली होती. निवडणूक प्रक्रियेला 13 ऑगस्टपासून प्रारंभ करण्यात येणार होता. या संदर्भात फिफाकडून अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला एक लेखी पत्र पाठवण्यात आल्याची माहिती या फेडरेशनचे सरचिटणीस एस. धर यांनी सांगितले. महिलांची ही विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणार असून या स्पर्धेतील सामने भुवनेश्वर, गोवा आणि मुंबई येथे निश्चित केले आहेत.









