तब्बल पाच वर्षानंतर पटकावले 100 वे स्थान : अर्जेटिना अव्वल स्थानी कायम, फ्रान्स दुसऱ्या तर ब्राझील तिसऱ्या स्थानी
वृत्तसंस्था /चेन्नई
भारतीय फुटबॉल संघाने 140 कोटींहून अधिक भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारी कामगिरी केली आहे. नुकतेच फिफाने ताजी क्रमवारी जाहीर केली. फिफा जागतिक क्रमवारीत भारतीय संघाने 100 वे स्थान मिळवले आहे. ही भारतीय फुटबॉल संघाची आतापर्यंतची सर्वोत्तम क्रमवारी आहे. फिफा जागतिक क्रमवारी जाहीर होताच भारतीय संघासाठी आनंदाची बातमी मिळाली. भारताने 101 स्थानावरून लेबनॉन आणि न्यूझीलंड या बलाढ्या देशांना पछाडत 100 वे स्थान पटकावले. जागतिक क्रमवारीत अव्वल 100 संघांमध्ये सामील होण्याची पाच वर्षातील भारताची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 15 मार्च, 2018 रोजी भारत 99 व्या स्थानी होता. सध्या भारतात सॅफ चॅम्पियनशिप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारताने सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. यानंतर नेपाळलाही पराभूत करण्याची किमया साधली होती. कुवेतविरुद्ध जिंकण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतीय संघाला स्वयंगोलमुळे बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. शानदार कामगिरीसह भारताने सॅफ चॅम्पियनशिपची उपांत्य फेरी गाठली असून या कामगिरीचाच भारताला फिफा क्रमवारीत फायदा झाला आहे.
अर्जेन्टिना अव्वल स्थानी कायम
वर्ल्डकप विजेत्या अर्जेंटिना संघाने ताज्या फिफा क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. अर्जेंटिनाने यावेळी फ्रान्सला पछाडले आहे. फ्रान्स क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. ब्राझीलचा संघ तिसऱ्या स्थानी असून इंग्लंड चौथ्या तर बेल्जियम पाचव्या स्थानावर आहे. तसेच, अमेरिकेचा संघही अव्वल 10 संघांच्या स्थानाजवळ पोहोचला आहे. अमेरिकन संघ 13 वरुन 11 व्या स्थानी पोहोचला आहे.
पाच वर्षानंतर भारतीय संघ शतकी क्लबमध्ये दाखल
दरम्यान भारतीय संघासाठी, गेल्या वर्षीच्या तुलनेत चार स्थानांची वाढ झाली असून, संघ प्रथमच एएफसी आशियाई चषकाच्या सलग दोन हंगामामध्ये भाग घेणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये व्हीएफएफ तिरंगी मालिकेत व्हिएतनामकडून 0-3 असा पराभव झाल्यापासून स्टिमॅक यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय पुरुषांनी अनेक सामन्यात यशस्वी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, 2023 मध्ये आतापर्यंत दोन अनिर्णित आणि सात विजयांसह भारतीय संघ अपराजित राहिला आहे. गतवर्षी गुवाहाटी येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर फिफा विश्वचषक पात्रता फेरीत भारताने ओमानविरुद्ध 1-2 असा शेवटचा पराभव पत्करला होता. त्यानंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर अपराजित राहून एक शानदार विक्रम केला आहे. भारताने यावर्षी मार्चमध्ये मणिपूर येथे तिरंगी मालिका आणि इंटरकाँटिनेन्टल चषक उंचावला. यामध्ये भारताने किर्गिझस्तान आणि लेबनॉन यांच्याविरुद्ध सहज विजय नोंदवला होता. भारतीय संघाने लेबनॉनवर नुकत्याच मिळवलेल्या विजयानंतर फिफा जागतिक क्रमवारीत वाढ झाली आहे. भारतीय संघ 1 जुलै रोजी सॅफ चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात लेबनॉनविरुद्ध दोन हात करेल.









