वृत्तसंस्था/ पॅरीस
अर्जेंटिनाला फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत जेतेपद मिळवून देणारा लायोनेल मेसी तसेच महिलांच्या विभागात स्पेनच्या अॅलेक्सिया पुटेलास याची फिफाच्या अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या विभागात सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली आहे.
फिफाच्या पुरुष विभागातील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कार शर्यतीमध्ये अर्जेंटिनाच्या लायोनेल मेसीने यावेळी फ्रान्सच्या कायलॉन एम्बापेला पुन्हा मागे टाकत हा पुरस्कार पटकावला आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या विभागात स्पेनच्या अॅलेक्सिया पुटेलासने सलग दुसऱ्या वर्षी फिफाचा हा पुरस्कार पटकावला आहे. पुरुषांच्या विभागातील या पुरस्काराकरिता लायोनेल मेसी, एम्बापे आणि करिम बेन्झेमा यांच्यात चुरस निर्माण झाली होती. गेल्या 14 वर्षांच्या कालावधीत अर्जेंटिनाच्या मेसीने फिफाचा हा पुरस्कार सातव्यांदा पटकावला आहे. कतारमध्ये झालेल्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सच्या एम्बापेने सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरस्कारासह गोल्डन बॉल चषक मिळवला होता. महिलांच्या विभागात स्पेनची महिला फुटबॉलपटू अॅलेक्सिया पुटेलास हिने फिफाचा हा पुरस्कार अमेरिकेची अॅलेक्स मॉर्गन आणि बेथ मेड यांच्याहस्ते स्वीकारला. 2022 साली युरोपियन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचे नेतृत्व बेथ मेडने केले होते. त्याचप्रमाणे 2022 च्या कालावधीतील फिफाच्या सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षक पुरस्कार अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लायोनेल स्केलोनी यांनी मिळवला आहे. तर महिलांच्या विभागातील हा पुरस्कार इंग्लंड महिला संघाच्या प्रशिक्षिका सारिना वेगमनने घेतला आहे.









