वृत्तसंस्था/ राजौरी
जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथील जंगलांमध्ये लागलेल्या आगीने मंगळवारी रात्री भीषण रुप धारण केले आहे. यामुळे वनसंपदेला नुकसान पोहोचत आहे. तर वन्यजीवांवरही संकट ओढवले आहे. वन्यप्राणी जीव वाचविण्यासाठी नागरी वस्तींच्या दिशेने धाव घेत आहेत. तर वनक्षेत्राला लागून असलेल्या भागांमध्ये आगीच्या धुरामुळे प्रदूषण फैलावले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
राजौरीला लागून असलेल्या गंभीर, नक्का, पंचग्राई, गंभीर ब्राह्मणा, गंभीर मुगलाच्या जंगलांमध्ये रविवार रात्रीपासून आग भडकली आहे. जोरदार वाऱयांमुळे आग वेगाने फैलावत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वन कर्मचाऱयांसोबत अग्निशमन दलाचे कर्मचारीही प्रयत्न करत आहेत. आगीमुळे अनेक वन्यप्राणी नागरी भागात दिसून येत आहेत.









