सैन्य-निमलष्करी दल आमने-सामने ः हल्ले सुरूच ः बचावकार्यात अडथळे
वृत्तसंस्था / खार्तूम
उत्तर आफ्रिकेतील देश सूदानमध्ये सत्तापालटासाठी सैन्य आणि निमलष्करी दल रॅपिड सपोर्ट फोर्स (आरएसएफ) दरम्यान संघर्ष सुरूच आहे. या संघर्षात आतापर्यंत 97 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 1,126 जण जखमी झाले आहेत. संघर्षामुळे राजधानी खार्तूम येथील रुग्णालयांमधील स्थिती अत्यंत अवघड झाली आहे. लढाईमुळे आरोग्य कर्मचाऱयांना जखमींपर्यंत पोहोचता येत नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
राजधानी खार्तूम समवेत अनेक भागांमध्ये सोमवारीही गोळीबार अन् स्फोट झाले आहेत. तर 16 एप्रिल रोजी या संघर्षात भारतीय नागरिक अल्बर्ट ऑगस्टीन यांचा मृत्यू झाला होता. गोळी लागल्याने अल्बर्ट यांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय दूतावासाने ट्विट करत दिली आहे. अल्बर्ट हे सूदानमध्ये डल ग्रूप कंपनीसाठी काम करत होते. भारत सरकारने सूदानमध्ये राहत असलेल्या स्वतःच्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भारतीय नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

तत्पूर्वी 16 एप्रिल म्हणजेच रविवारी 56 लोकांचा मृत्यू झाल्यावर सैन्य आणि आरएसएफ यांच्यात तीन तासांकरता तात्पुरता संघर्षविराम झाला होता. दोन्ही बाजूंनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या या पुढाकाराचे समर्थन केले होते.
महत्त्वाच्या कार्यालयांवर कब्जा
उठाव करू पाहणाऱया निमलष्करी दलाने राजधानी खार्तूम येथील बहुतांश शासकीय कार्यालयांवर कब्जा केल्याचा दावा केला आहे. खार्तूम विमानतळ, राष्ट्रपती भवन आणि अन्य शासकीय कार्यालयांवर ताबा मिळविला आहे. तसेच राष्ट्रीय प्रसारण वाहिनी आणि सैन्य मुख्यालयावरही नियंत्रण मिळविल्याचा दावा आरएसएफने केला आहे. खार्तूममध्ये शाळा, बँका आणि शासकीय कार्यालये बंद करण्यात आली आहेत. राजधानीच्या रस्त्यांवर तोफा अन् चिलखतीन वाहने दिसून येत आहेत. तर सैन्य आणि आरएसएफ मुख्यालयानजीक अवजड शस्त्रसामग्रीसाठी सुरक्षा दल तैनात आहे.
सत्तापालटाची पार्श्वभूमी
सूदानमध्ये सैन्य आणि निमलष्करी दलादरम्यान वर्चस्वाची लढाई सुरु आहे. 2019 मध्ये सूदानचे तत्कालीन अध्यक्ष ओमर अल-बशीर यांना सत्तेवरून हटविण्यासाठी लोकांनी निदर्शने केली होती. एप्रिल 2019 मध्ये सैन्याने ओमर यांना अध्यक्षपदावरून हटवत सत्तापालट घडवून आणला होता. परंतु त्यानंतर लोकांनी लोकशाही शासन आणि सरकारमधील स्वतःच्या भूमिकेची मागणी लावून धरली होती. यामुळे सूदानमध्ये एक संयुक्त सरकार स्थापन करण्यात आले, ज्यात नागरिक आणि सैन्य दोघांचीही भूमिका होती.
सैन्य अन् आरएसएफ प्रमुख सत्तास्थानी
2021 मध्ये तेथे पुन्हा सत्तापालट झाले आणि सूदानमध्ये सैन्य राजवट लागू झाली. सैन्यप्रमुख जनरल अब्देल फतह अल-बुरहान हे अध्यक्ष तर आरएसएफ प्रमूख मोहम्मद हमदान डागालो हे उपाध्यक्ष झाले. तेव्हापासून आरएसएफ आणि सैन्य यांच्यात संघर्ष सुरू आहे. नागरी सरकार आणण्याच्या प्रयत्नांवरून आरएसएफ आणि सैन्य आमनेसामने आहे. आएसएफ नागरी शासन 10 वर्षांनंतर लागू करू इच्छिते. तर 2 वर्षांत लोकशाहीच्या मार्गाने सरकार आणण्यासाठी सैन्य प्रयत्नशील आहे.
जागतिक शक्तींचे आवाहन
सूदानमधील वाढती हिंसा पाहता अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय महासंघाने त्वरित लढाई संपविण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघ महासचिवांनी सैन्यप्रमुख बुरहान आणि आरएसएफ प्रमुख डागालो यांना फोन करून देशात शांतता प्रस्थापित करण्याची सूचना केली आहे. सूदानमधील रशियाच्या दूतावासाने देखील शस्त्रसंधी लागू करण्याचे आवाहन पेले.









