206 खेळाडूंचा सहभाग, 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरदरम्यान आयोजन
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
फिडे विश्वचषक 2025 मध्ये 206 खेळाडू सहभागी होणार असून आठ फेऱ्यांमध्ये दोन सामन्यांच्या बाद स्वरूपात ते स्पर्धा करतील. भारतात होणाऱ्या या विश्वचषकाचे अखेर यजमान शहर जाहीर झाले असून मंगळवारी जागतिक बुद्धिबळ प्रशासकीय मंडळाने गोव्याला अधिकृत यजमानपदाची घोषणा केली. हा विश्वचषक 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरदरम्यान खेळविला जाईल. तथापि, 5 वेळचा विजेता मॅग्नस कार्लसन या स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता नाही. सुऊवातीला, भारताची राजधानी नवी दिल्ली हे यजमानपदाचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते, परंतु त्याबद्दल काही चिंतेच्या बाबी असल्यामुळे पुनर्विचार करावा लागला.
‘भारत हा बुद्धिबळातील सर्वांत बलवान देशांपैकी एक बनला आहे, तिथे उत्कृष्ट खेळाडू आणि उत्साही चाहते आहेत. या वर्षाच्या सुऊवातीला जॉर्जियामध्ये झालेल्या फिडे महिला विश्वचषकाच्या यशानंतर आम्हाला गोव्यात फिडे विश्वचषक आयोजित करताना अभिमान वाटतो. हा बुद्धिबळाचा उत्सव असेल आणि जगभरातील खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव असेल. 90 हून अधिक देशांचे प्रतिनिधी यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे आणि हा बुद्धिबळ इतिहासातील सर्वांत जास्त पसंती लाभलेल्या कार्यक्रमांपैकी एक असेल’, असे अध्यक्ष अर्काडी ड्वोरकोविच यांनी सांगितले.
‘भारतीय बुद्धिबळासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे आणि आम्ही असा कार्यक्रम आयोजित करण्यास वचनबद्ध आहोत, जो आमच्या चाहत्यांच्या आवडीला आणि आमच्या महासंघाच्या व्यावसायिकतेला प्रतिबिंबित करेल. विश्वचषक देशभरातील लाखो लोकांना केवळ प्रेरणा देणार नाही तर बुद्धिबळाचे जागतिक केंद्र म्हणून भारताची वाढती प्रतिष्ठा देखील प्रदर्शित करेल. गोव्यात 2025 चा विश्वचषक आयोजित करण्याचा मान भारताला दिल्याबद्दल आम्ही फिडेचे मनापासून आभारी आहोत’, असे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष नितीन नारंग यांनी म्हटले आहे.
फिडेनुसार, 206 पैकी किमान 21 भारतीयांनी या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या यादीत पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद, जो पूर्णपणे निवृत्त झालेला नाही आणि फिडे उपाध्यक्ष देखील आहे तसेच विद्यमान विश्वविजेता गुकेश आदी नावे आहेत.









