सलग दुसरे जेतेपद, ‘कँडिडेट’ स्पर्धेसाठी पात्र, ओपन विभागात अनीश गिरीला जेतेपद
वृत्तसंस्था/ समरकंद, उझबेकिस्तान
भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने 11 व्या आणि शेवटच्या फेरीत माजी विश्वविजेत्या चीनच्या झोंगयी तानविऊद्धच्या कठीण बरोबरीनंतर सलग दुसऱ्यांदा फिडे महिला ग्रँड स्विस स्पर्धा जिंकली आणि महिला कँडिडेट स्पर्धेत स्थान मिळविले. खुल्या विभागा अनीश गिरीला विजेतेपद मिळाले.
रशियन कॅटेरिना लॅग्नोने अझरबैजानच्या उल्विया फतालियाव्हासोबत बऱ्यापैकी लवकर सामना बरोबरीत सोडविला आणि संभाव्य 11 पैकी आठ गुणांनिशी वैशालीसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. वैशालीव्यतिरिक्त लॅग्नो ही येथून कँडिडेटसाठी पात्र ठरलेली दुसरी खेळाडू बनली आहे. वैशाली खूप उच्च क्रमांकावर असलेल्या झोंगयीसोबत खेळल्यामुळे थोडा चांगला टाय-ब्रेक स्कोअर मिळवून तिने स्पर्धा जिंकली. या भारतीय ग्रँडमास्टरने 2023 मध्ये ब्रिटनच्या आयल ऑफ मॅन येथे झालेली स्पर्धा देखील जिंकली होती. येथील तिच्या विजयावरून असे दिसून येते की, भारतीय महिला खेळाडू देखील लवकरच पुऊष बुद्धिबळपटूंप्रमाणे प्रसिद्धीच्या झोतात येणार आहेत.
वैशालीने सहा सामने जिंकले, एक गमावला आणि उर्वरित चार सामने अनिर्णित राहिले. प्रतिस्पर्ध्यांच्या रेटिंगच्या सरासरीच्या आधारे काढलेला तिचा टायब्रेक स्कोअर लॅग्नोपेक्षा फक्त एकाने गुण जास्त असल्याचे सिद्ध झाले. या विजयाचा अर्थ असा आहे की, वैशाली आणि प्रज्ञानंद पुन्हा एकदा कँडिडेटमध्ये प्रवेश करतील. जागतिक विजेत्याचा आव्हानवीर त्या स्पर्धेतून ठरणार आहे. फिडे ग्रँड स्विसमधील इतर कोणत्याही भारतीयाला कँडिडेटमध्ये स्थान मिळवता आले नाही.
खुल्या गटात अनीश गिरी विजेता
कँडिडेट स्पर्धेत एकूण आठ खेळाडूंना खेळता येणार असून दोन स्थाने या स्पर्धेतून ठरली आहेत. अनीश गिरी हा खुल्या विभागात विजेता ठरला. त्याने अमेरिकेच्या हान्स मोके निमनला हरवले. अनीशने संभाव्य 11 पैकी आठ गुणांसह स्पर्धा संपवली आणि बहुदा मॅथियास ब्लुबॉम दुसऱ्या स्थानावर राहून कँडिडेटमध्ये स्थान मिळवणार आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार, अनीश गिरी आणि मॅथियास ब्लुबॉम (या स्पर्धेतून), अमेरिकेचा हिकारू नाकामुरा (रेटिंगच्या आधारे), आर. प्रज्ञानंद (त्याच्या स्पर्धांतील कामगिरीच्या आधारे) आणि अमेरिकेचा फॅबियानो काऊआना कँडिडेटमध्ये स्थान मिळवतील.
पुढील महिन्यात गोव्यात होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ चषक स्पर्धेतून शेवटची तीन स्थाने भरली जातील. कँडिडेटमधील विजेता खेळाडू जागतिक विजेता डी. गुकेशला आव्हान देईल. पुऊष गटात भारतीयांच्या दृष्टीने फक्त एकच स्थान निश्चित दिसत असले, तरी महिला गटातून आधीच तीन खेळाडूंनी या स्पर्धेत स्थान मिळवले आहे. दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी गेल्या महिला विश्वचषकात अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवून पात्र ठरल्या आहेत. वैशाली आता त्यांच्यात सामील झाल्यामुळे कँडिडेट स्पर्धा जिंकण्याच्या शर्यतीत तीन भारतीय महिला झळकतील.









